मुंबई : काहीही झालं तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत राहू अशा आणाभाका घेणाऱ्या खासदारांनी आता त्यांची साथ सोडली आहे. त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांचाही समावेश आहे. ओमराजेंनी ठाकेरंची साथ सोडल्यानंतर त्यांचे काही जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमावेळचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये ओमराजे ऑपरेशन टायगरवर बोलत आहेत. ग्रामपंचायतीची निवडणूक न लढलेल्या व्यक्तीला उद्धव साहेबांनी एकदा आमदार आणि दोन वेळा खासदार केलं. माझ्या स्वार्थासाठी जर मी त्यांना सोडलो तर लोकांशी नजर मिळवू शकणार नाही, असं ओमराजेंनी त्यामध्ये म्हटलं होतं.
नेमकं काय म्हणाले होते ओमराजे निंबाळकर?
ऑपरेशन टायगर संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले होते की, मी कर्माला मानणाला माणूस आहे. 2009 साली माझी काय अवस्था होती? त्यावेळी ओमराजेने ग्रामपंचायतीची तर निवडणूक लढवली होती का? त्या दिवशी बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी विधानसभेची उमेदवारी दिली. राजकीय क्षेत्रात मला त्यांनी संधी दिली, त्यामुळेच मी आज इथेपर्यंत येऊन पोहोचलो. एकदा विधानसभेत आमदार, दोन वेळा संसदेत खासदार झालो हे केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळेच. आता या लोकांना सोडायचं कारण काय? केवळ आपल्या स्वार्थासाठी, मला पैसे मिळतील, मला सत्ता मिळेल या कारणासाठी मी जर त्यांना सोडलो तर मी लोकांशी नजर मिळवू शकणार नाही.”
ओमराजे निंबाळकरांचा हा जुना व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत असून त्यावर सोशल मीडियामध्ये प्रतिक्रियाही उमटत आहेत.
धाराशिवमध्ये कार्यकर्त आक्रमक
धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांना भरभरून संधी दिली, एकदा आमदार आणि दोनदा खासदार केले, तरीही त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्यास, तो वेदनादायी ठरेल, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख बंडू आदरकर आणि सुरेश गवळी यांनी इशारा देत, ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास दिसतील तिथं तोंडाला शेण फासणार, असा इशारा दिला. धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून पक्षाशी गद्दारी कधीही सहन केली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
ठाकरेंचे कोणते खासदार फुटले?
1. संजय जाधव (परभणी)
2. संजय देशमुख (यवतमाळ– वाशिम)
3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)
ही बातमी वाचा:
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद