अभिनेत्री संचिता उगलेच्या मृत्यूचं गूढ वाढलं, कुटुंबीयांकडून गंभीर आरोप करत सखोल तपासाची मागणी – Marathi News | Family makes serious allegations regarding actress Sanchita Ugale death


मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री संचिता उगले हिच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात नवे प्रश्न उपस्थित होत असून, तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. संचिता हिचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे केली आहे.

कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, वरवर पाहता संचिता तिच्या कारकिर्दीत यशस्वी वाटत होती आणि मनोरंजन क्षेत्रातील तिचे कामही सुरळीत सुरू होते. मात्र, प्रत्यक्षात ती गेल्या काही काळापासून मानसिक तणावाखाली होती. तिचा कोणीतरी सातत्याने मानसिक छळ करत होता, तिच्यावर विविध प्रकारचा दबाव टाकला जात होता आणि पैशांची मागणीही केली जात होती, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संचिता अनेकदा चिंताग्रस्त आणि उदास दिसत असे. ती बाहेरून नेहमीप्रमाणे आनंदी आणि उत्साही असल्याचा भास निर्माण करत होती, मात्र काही वेळाने अचानक नैराश्यात जात असल्याचे त्यांच्या लक्षात येत होते. तिच्या मानसिक स्थितीबाबत कुटुंबीयांना चिंता वाटत असल्याने तिला शक्यतो एकटे सोडले जात नव्हते. तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुटुंबातील सदस्य तिच्यासोबत नियमितपणे ये-जा करत होते.

कुटुंबियांनी व्यक्त केली खंत

मात्र, दुर्दैवाने ज्या अल्प काळात संचिता एकटी होती, त्याच काळात ही धक्कादायक घटना घडल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या घटनेबाबत बोलताना त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली. ‘जर त्या काही मिनिटांत ती एकटी नसती तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कुटुंबीयांनी असेही म्हटले की, संचिता तिच्यावर होत असलेल्या त्रासाबाबत अधिक स्पष्टपणे बोलली असती तर परिस्थिती हाताळणे शक्य झाले असते. मात्र, तिने तिच्या मनातील वेदना आणि तणाव पूर्णपणे कोणासमोर व्यक्त केला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

या प्रकरणात संचिता हिच्या सहकलाकारांपैकी किंवा ओळखीतील एखादी व्यक्ती तिचा मानसिक छळ करत असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत कोणाचेही नाव त्यांनी जाहीर केलेले नाही. सत्य परिस्थिती पोलिस तपासातून, तिच्या मोबाईल फोनमधील माहिती, कॉल रेकॉर्ड, संदेश आणि इतर डिजिटल पुराव्यांमधून समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *