मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरसंबंधी (Maharashtra Operation) अद्यापही संभ्रम असल्याचं चित्र आहे. ठाकरेंच्या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना सह्यांचं पत्र दिलं असल्याची चर्चा सुरू असताना ते पत्र किंवा सहा खासदारांचा फोटो मात्र अद्याप समोर आला नाही. त्यामुळे सहापैकी दोन खासदारांनी सह्याच केला नसल्याचा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे. तसेच या खासदारांवर सध्या कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका अशा आदेशही देण्यात आला आहे.
ठाकरेंच्या सहा खासदारांनी त्यांची साथ सोडल्याने ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्या सहापैकी दोन खासदार हे अद्यापही आपल्या शिवसेनेसोबत असल्याचा दावा आता ठाकरेंकडून करण्यात येत आहे. लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात सहा खासदारांच्या सह्या नसल्याचा दावाही ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे.
गुरुवारच्या बैठकीत चित्र स्पष्ट
ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची गुरुवारी बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी प्रतोद अनिल देसाई यांनी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे या बैठकीला आता कोण कोण खासदार उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ज्या सहा खासदांरांची चर्चा सुरू आहे त्यापैकी किती खासदार उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणार यावरुन शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर यशस्वी झालं की नाही हे स्पष्ट होणार आहे.
Omraje Nimbalkar : भाजपकडून शब्द हवा
संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचे दोन्ही मतदारसंघ भाजपचे असल्यानं 2029 साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत या दोघांचंही राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळेच या दोन्ही खासदारांना भाजपच्या नेत्यांकडून शब्द हवा आहे. 2029 सालच्या निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळेल असा शब्द त्यांना भाजपच्या नेत्यांकडून हवा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या नेत्यांशी भाजपने संवाद सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदेंनी सुरू केलेलं हे ऑपरेशन टायगर पूर्णत्वास नेण्यासाठी भाजपच्या नेत्यांचा शब्द गरजेचा आहे. त्या दृष्टीने भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
Sanjay Dina Patil : तर ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित राहणार
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्यासमोर भाजपच्या मिहीर कोटेचा यांचं आवाहन आहे. त्यामुळे 2029 च्या निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळणार, असा शब्द संजय दीना पाटील यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून हवा आहे. याच कारणामुळे संजय दीना पाटील यांनी अद्याप सही केली नसल्याची माहिती समोर येत आहे. बुधवार रात्रीपर्यंत जर भाजपकडून असा शब्द आला नाही तर संजय दीना पाटील हे गुरुवारी होणाऱ्या ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाकरेंचे कोणते खासदार फुटल्याची चर्चा?
1. संजय जाधव (परभणी)
2. संजय देशमुख (यवतमाळ– वाशिम)
3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)
ही बातमी वाचा:
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद