Nasrapur Case Crime news: पुण्यातील नसरापूर येथे तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे (Bhimrao Kamble) या नराधमाला पुणे सत्र न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. या घटनेमुळे राज्यभरात संताप होता. पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत या घटनेचा तपास पूर्ण करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन दोन महिन्यात नसरापूर प्रकरणाचा (Nasrapur Case) निकाल देण्यात आला. हे संपूर्ण प्रकरण वेगाने मार्गी लागण्यात पोलिसांचा तपास महत्त्वाचा ठरला. विजयमाला पवार यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने अवघ्या 15 दिवसांत या संपूर्ण प्रकरणातील सगळे पुरावे आणि तांत्रिक बाबी शोधून काढल्या. तपासधिकारी विजयमाला पवार यांनी भीमराव कांबळे याला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी 15 दिवसांच्या तपासाची सारी हकीकत मांडली. (Pune Crime news)
1 मे 2026 रात्री 11 ते सव्वा अकराला मला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की, नसरापूरमध्ये एक अत्यंत वाईट घटना घडली आहे. तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केलेला आहे. तिची बॉडी ससून रुग्णालयात आणली आहे, तुम्ही तिकडे तातडीने जा. नसरापूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तु्म्ही तातडीने ससून रुग्णालयात पोहोचा, पुढचे आदेश कळवतो तुम्हाला कळवण्यात येतील, असे मला सांगण्यात आल्याचे विजयमाला पवार यांनी म्हटले.
मी रात्री ससून रुग्णालयात पोहोचले तेव्हा या प्रकरणाचा तपास माझ्याकडे सोपवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. 2 तारखेला पंचनामा झाला. या प्रकरणाचा तपास सुरु असताना 15 दिवस आम्ही पहाटे चार-पाज वाजता घरी यायचो आणि सकाळी दहा वाजता पुन्हा तपास सुरु व्हायचा. या काळात आमच्या टीमने विक्रमी वेळेत सगळे पुरावे आणि साक्षीदार गोळा केले. त्यानंतर 15 दिवसांत चार्जशीट सादर केली. भीमराव कांबळेला फाशी झाली तेव्हा चिमुकलीला न्याय मिळाला, असे आम्हाला वाटल्याचे विजयमाला पवार यांनी सांगितले.
Pune Crime news: ससून रुग्णालयात पोहोचल्यानंतर काय पाहिलं?
विजयमाला पवार यांनी 1 मेच्या रात्री ससून रुग्णालयात पोहोचल्यानंतर काय घडले, याविषयी सांगितले. ज्यावेळी आम्ही पोलीस म्हणून तपास करतो तेव्हा सगळ्या गोष्टींकडे त्रयस्थ म्हणून बघावे लागते. मी ससून रुग्णालयात चिमुरडीचा मृतदेह पाहिला तेव्हा तिच्या अंगावर जखमा होत्या. अत्यंत वाईट परिस्थिती होती, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. हे पाहून एक आई म्हणून माझे मनही हळहळले. मात्र, या भावना बाजूला ठेवून आम्ही तपास केला. मुलीचा मृतदेह परत घेऊन जाताना तिची बॉडी रस्त्यावर ठेऊन आंदोलन झाले. या घटनेमुळे प्रचंड जनआक्रोश पाहायला मिळाला, असे विजयमाला पवार यांनी सांगितले.
Bhimrao Kamble: भीमराव कांबळेला नसरापूरमध्ये पहाटेच्यावेळी का नेलं? विजयमाला पवारांनी सांगितलं कारण
नसरापूर प्रकरणात दोनवेळा पंचनामे झाले. आरोपी भीमराव कांबळे याने गुन्ह्याची कबुली दिली. हे कृत्य मी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्याने ही घटना कुठे केली, चिमुरडीला तो तिकडे कसा घेऊन गेला? काय-काय आणि कसं केलं?, हे आम्ही घटनास्थळी जाऊन पाहिले. भीमराव कांबळे याला आम्ही पहाटेच्यावेळी नसरापूर येथे घेऊन गेलो. कारण जनाआक्रोश इतका होता की, त्याच्या जीवाला धोका होता. आम्हाला तपास करण्यासोबतच त्याच्या जीवाची काळजीही घ्यायची होती. कारण लोकशाहीत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत गुन्हेगाराला फाशीवर लटकवता येत नाही, असे विजयमाला पवार यांनी सांगितले.
आम्ही भीमराव कांबळे याला पहाटे नसरापूरमध्ये घेऊन गेलो. त्याने चिमुरडीला राम मंदिरापासून गोठ्यापर्यंत कसे नेले? गाठीशी शेव कुठे खायला दिली, ती कुठून विकत घेतली होती? या सगळ्या गोष्टी त्याने आम्हाला दाखवल्या. ही घटना घडली त्यादिवशी सकाळी चिमुरडी आजीसोबत राम मंदिरात जाऊन पूजा करुन आली. त्यानंतर आजीने तिला आंघोळ घालून भरपेट खायला दिले होते. त्यानंतर तासाभरात होत्याचं नव्हतं झालं. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांवर खूप मोठा आघात झाला होता. तेव्हापासून या कुटुंबाने आपल्या भावना दाबून ठेवल्या होत्या. न्यायालयाने भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टात कुटुंबीयांच्या भावनांचा बांध फुटला, असे विजयमाला पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?