ठाकरे गटातून आणखी कोण कोण फुटणार? गुलाबराव पाटील यांनी सर्वच सांगून टाकलं, म्हणाले, तुम्हाला आश्चर्य… – Marathi News | Gulabrao Patil’s Big Hint: More ‘Surprising Faces’ From Thackeray Faction Eyeing Shinde Camp


गुलाबराव पाटील यांनी दिली मोठी हिंट

ठाकरे गटाला आठवड्याभरातच दुसरा मोठा झटका बसला आहे. गेल्या आठवड्यात सहा खासदारांनी ठाकरेंची साथ सोडून थेट शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे राज्यात खळबळ उडालेली आहे. खासदार गेल्यानंतर संघटन जागेवर राहावं म्हणून उद्धव ठाकरेंनी या फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरेही सुरू केले आहेत. काल उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, आज उद्धव ठाकरे यांना सलग दुसरा झटका बसला आहे. उद्धव ठाकरे यांचा अत्यंत जवळचा सहकारी आणि विश्वासू नेता सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. सचिन अहिर यांनी पक्ष सोडताच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं. एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात कोण कोण आहेत? याबाबतचं सूचक विधानच पाटील यांनी केलं आहे.

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठी हिंट दिली आहे. सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदाचा उमेदवारी अर्ज भरला आहे. आम्ही जे भाकीत करत होतो ते सत्य होत आहे. काही गोष्टींची गुप्तता ठेवावी लागते, तशी ही ठेवली होती, असं सांगतानाच तुम्हालाही आश्चर्य वाटेल असे चेहरे आमच्या संपर्कात आहेत. आता हे ऑपरेशन कधी करायचं हे दाढीवाल्याबाबतच्या हातात आहे, असं सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच ऑपरेशन टायगर अजून संपलेलं नसल्याचे संकेतही या निमित्ताने मिळत आहेत.

फुटीमागे एकच कारण नाही…

आमदार, खासदार फुटतात हा सर्वांनाच धक्का आहे. पक्षात एकाच माणसाचं ऐकलं जातं. तो सांगतो ते बोललं जातं. आमदारांना अपेक्षित आहे ते होतच नाही. आज जे घडलं त्यामागे एक कारण नाही, बरीच कारणं आहेत. बघा काय होतं ते, असं गुलाबराव पाटील म्हणाले. नीलम गोऱ्हे यांना उपसभापतीपदाची उमेदवारी मिळणार होती, त्याबाबत विचारलं असता, आमच्याकडे एकच पद्धत आहे. कोणी कितीही इच्छुक असलं तरी मुख्य नेता जे नाव सांगतो तेच होतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पक्षाला दिशाच नाही…

ठाकरे गटात आमदार आणि कार्यकर्त्यांची कदर नाही. पक्षाचे कार्यक्रम, आंदोलन आणि दिशा ठरत नसल्याने खासदारांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच उदासीन आहेत. पूर्वी कार्यक्रम असायचे. आंदोलने व्हायची. दिशा ठरायची. आम्ही आंदोलनं करायचो. विरोधात होतो तरी पक्षाचा एक कार्यक्रम असायचा. आता काहीच होत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *