मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला आता मुंबईतूनच मोठा धक्का बसला आहे, मुंबईतील वरळीचा चेहरा असलेल्या विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांनीच थेट एकनाथ शिंदेंशी हातमिळवणी केल्याचं दिसून येत आहे. कारण, विधानपरिषद उपसभापती पदासाठी अर्ज करताना आज सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी, त्यांनी शिवसेना ठाकरे गटातील काही सहकाऱ्यांना मेसेज करुन आपली राजकीय भूमिका सांगितली होती. त्यामुळे, सचिन अहिर (Sachin ahir) यांच्या जाण्याने ठाकरेंना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. त्यावर, मंत्री नितेश राणे (Nitesh rane) यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.
विधान परिषदेतील उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी अर्ज भरला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. सचिन अहिर शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. या दे धक्क्यानंतर नितेश राणेंनी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर घणाघाती टीका केली.
शेवटी हे सगळे उद्धव ठाकरेचे पाप आहेत, 2019 ला राजकीय धर्मांतर केलं नसतं तर आता अशी लायकी राहिली नसती ना. शेवटी सचिन अहिर हे काही छोटा माणूस नाही. पश्चिम बंगालमध्ये टीएमसी कसं खाली झालंय, त्याचं मूळ कारण हे अभिषेख बॅनर्जी आहे, तसं महाराष्ट्रातही आमच्याकडे एक अभिषेक बॅनर्जी आहे, त्याचे हे परिणाम आहेत, असेही नितेश राणे यांनी म्हटले. आदित्य ठाकरेंनी आता राजीनामा देऊन वरळीतून निवडून येऊन दाखवावे, असं चॅलेंज नितेश राणेंनी दिलंय. सचिन अहेर, सुनिल शिंदे यांच्यामुळेच आदित्य ठाकरे सभागृहात बसून टोमणे मारत आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांच्या घरातील लोकांच्या स्वभावामुळे हे लोकं सोडून जात आहेत. जो बाळासाहेबांचा झाला नाही, तो आमदार-खासदार आणि शिवसेना सहकाऱ्यांचा काय होणार? अशा शब्दात राणेंनी हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनू दिलं नाही, त्यांना रोखलं आणि आता पंतप्रधानपदाच्या गोष्टी करतात. तो नी* माणूस आहे, अशा शब्दात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच, आता उद्धव ठाकरेंनी लग्नात फोटोग्राफी करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?