Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?


Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election 2026) अनुषंगाने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. नाशिक जिल्ह्यात महायुतीकडे तब्बल 450 मतदारांचे स्पष्ट आणि प्रचंड बहुमत आहे, तसेच विरोधी पक्षाचा कोणताही अधिकृत उमेदवार मैदानात नाही. असे असतानाही महायुतीमध्ये कमालीची धाकधूक पाहायला मिळत असून, ऐनवेळचा दगाफटका टाळण्यासाठी थेट ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा अवलंब करावा लागला आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाचे नेते वसंत गीते यांच्या एका वक्तव्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Vasant Gite: नेमकं काय म्हणाले वसंत गीते? 

अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी माघार घेतली असली, तरी ठाकरे सेनेचे नेते वसंत गीते यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नव्या खेळीची चर्चा सुरू झाली आहे. वसंत गीते म्हणाले, “आम्ही पक्ष नेतृत्वासोबत बोलून स्थानिक महाविकास आघाडीच्या बैठकीत युतीच्या विरोधात मतदानाचा अजेंडा राबवणार आहोत. नाशिक विधान परिषद निवडणुकीसंदर्भात लवकरच महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतील.” वसंत गीतेंच्या या विधानामुळे गोकुळ गीते यांच्या उमेदवारीची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली असून महाविकास आघाडी युतीच्या उमेदवाराविरोधात छुपे मतदान घडवून आणण्याची मोठी खेळी खेळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Nashik Vidhan Parishad Election 2026: तांत्रिक बाबीचा फायदा महाविकास आघाडी उचलणार?

दरम्यान, नाशिक विधान परिषद निवडणुकीत मागील काही दिवसांत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या कार्यपद्धतीवर मित्रपक्ष भाजपचे बंडखोर, अपक्ष उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि खुद्द शिंदे गटातील काही नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांची बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे आणि मंत्री उदय सामंत या तीन बड्या मंत्र्यांना नाशिकमध्ये ठाण मांडावे लागले होते. दीर्घ चर्चेनंतर गोकुळ गिते यांनी माघार घेतली आहे, तरी तांत्रिक अडचण (Technical Issue) अशी आहे की, गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे या दोन्ही बंडखोरांची नावे मतपत्रिकेवर कायम असणार आहेत. याच तांत्रिक बाबीचा फायदा महाविकास आघाडी घेण्याच्या तयारीत आहे.

Nashik Vidhan Parishad Election 2026: महायुतीचे ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’

शनिवारी शिवसेना शिंदे गटाचे शहरी आणि ग्रामीण भागातील नगरसेवक ठाण्याच्या दिशेने रवाना झाले होते, तर सोमवारी भाजपचे (BJP) नगरसेवक देखील ठाण्याकडे सहलीसाठी रवाना झाले आहेत. 18 जून रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी कोणतीही जोखीम न पत्करण्यासाठी या सर्व लोकप्रतिनिधींना थेट मतदानाच्या दिवशीच नाशिकमध्ये आणले जाणार आहे. आता एकीकडे महायुतीने नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवले असले, तरी दुसरीकडे महाविकास आघाडी कोणती छुपी रणनीती आखणार आणि 18 जूनला नेमकं काय घडणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिक विधान परिषदेसाठी बहुमत असूनही महायुतीची धाकधूक का वाढली? कुठं बिघडू शकतं समीकरण, जाणून घ्या सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *