पुणेकर पाणी जपून वापरा! दिवसाआड पुरवठा, पण ‘ती’ चूक महागात पडणार, थेट कारवाई होणार | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

Pune Water Supply: हवामान विभागाने 20 जूननंतर पावसाची शक्यता वर्तविली आहे. पाऊस समाधानकारक झाल्यास पाणीकपातीचे संकट कमी होऊ शकते.

पुणेकर पाणी जपून वापरा! ‘ती’ चूक महागात पडणार, थेट कारवाई होणार
पुणेकर पाणी जपून वापरा! ‘ती’ चूक महागात पडणार, थेट कारवाई होणार

पुणे: सध्या पुणे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. पाणीकपातीच्या काळात पिण्याचे पाणी वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव तसेच अन्य अनावश्यक कामांसाठी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी सांगितले की, पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात येत आहेत. पुढील चार दिवसांत ही पथके शहरातील विविध भागांमध्ये पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतील. पाणीटंचाईच्या परिस्थितीत प्रत्येक थेंब महत्त्वाचा असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पुण्यात दिवसाआड पाणी

पुणे शहरात सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी पाणीपुरवठ्याबाबत फारशा तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात पाणीपुरवठा विभागातील 12 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पाणीपुरवठ्यादरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी बदली झालेल्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला आहे.

हवामान विभागाने 20 जूननंतर पावसाची शक्यता वर्तविली आहे. पाऊस समाधानकारक झाल्यास पाणीकपातीचे संकट कमी होऊ शकते. मात्र पावसाला आणखी विलंब झाला किंवा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला, तर पुढील वर्षभर पुणेकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागू शकतो, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

गुरुवारी पाणीपुरवठा बंद

याचबरोबर, विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपूल आणि ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे 600 मिमी व्यासाची जलवाहिनी स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी, 18 जून रोजी येरवडा, विश्रांतवाडी आणि परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 17 आणि 19 जून रोजी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होईल, तर 20 जूनपासून पुन्हा सम-विषम तारखांनुसार पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

मराठी बातम्या/पुणे/

पुणेकर पाणी जपून वापरा! दिवसाआड पुरवठा, पण ‘ती’ चूक महागात पडणार, थेट कारवाई होणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *