केतनच्या हत्येचा प्लान कसा ठरला ?
केतन अग्रवाल याच्या हत्येचे दोनदा प्रयत्न झाले होते. दुसऱ्या प्रयत्नात सियाला यश आलं. दुसरा प्रयत्न फेल गेला असता तर तिसरा प्लानही ठरला होता. तिसऱ्या प्लाननुसार महाबळेश्वरमध्येच केतनची हत्या करण्यात येणार होती, अशी माहिती समोर येत असतानाच आता नवीन अपडेट उघड झाली आहे. साखरपुड्याच्या अवघ्या तीन महिन्यानंतरच केतनची हत्या करण्यात येणार होती. ही हत्या लोहगड किल्ल्यावरच करण्यात येणार होती. त्यासाठी किल्ल्याची रेकीही करण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच 31 मे रोजीच केतनला धक्का देण्याचा विचार सियाच्या मनात आला होता, अशी नवी माहितीही समोर आली आहे.
पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. चेतन चौधरी आणि सिया गोयलने मिळून केतनच्या हत्येचा प्लान केला होता. केतनला मारण्यासाठी सिया आणि चेतनने मे महिन्यापासूनच लोहगड किल्ल्याची रेकी सुरू केली होती. फेब्रुवारीत सियाचा साखरपुडा झाला होता. नोव्हेंबरमध्ये सिया आणि केतनचं लग्न होणार होतं. हे लग्न होऊ नये म्हणून चेतन आणि सियाच्या खटपटी सुरू होत्या. त्यामुळेच साखरपुड्याच्या तिसऱ्या महिन्यातच म्हणजे मे महिन्यात लोहगड किल्ल्याची रेकी केली होती. दोघांनीही जागा निवडली आणि पुढचं प्लानिंग केल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
तेव्हाच मनात विचार…
31 मे रोजी सिया आणि केतन लोहगड किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी केतन एका धोकादायक जागेवर बसला होता. तेव्हा सियाने त्याला तिथून उठण्यासाठी सांगितलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेव्हाच केतनला धक्का देण्याचा विचार सियाच्या मनात आला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही केतनला कथितपणे धक्का देण्याचा प्रयत्न झाला होता. पण तो वाचला होता. त्यावेळी सियाने साप आल्याचा बहाणा बनवला होता.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?
पोलिसांनी 18 जून रोजीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. यात चेतनच्या संशयास्पद हालचाली दिसत आहत. पोलिसांनी केलेल्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चेतन किल्ल्यावर चढला. त्यानंतर 40-45 मिनिटानंतर परत खाली आला होता. किल्ल्यावर चढण्यासाठी जवळपास 25 मिनिटे लागतात. तर खाली यायला 15 मिनिटे लागतात. तपास अधिकाऱ्यांच्या संशया नुसार, चेतन हा केतन आणि सियाची एका सुनसान जागेवर 8 मिनिटे वाट पाहत होता.
चेतन आपल्या मागोमाग येतोय की नाही हे सिया वारंवार मागे वळून पाहत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. दोघांमध्ये इशारे होते असल्याचंही समोर आलं आहे. हा मजबूत पुरावा हाती लागल्यानंतर पोलीस आता अधिक खोलात तपास करत आहेत.
नीरज कुमार साक्षीदार होणार…
आरोपी चेतन चौधरीच्या दुकानातील कर्मचारी नीरज कुमार साक्षीदार होणार असल्याचे सांगितले जात आहे. स्वतःचे लोकेशन पुण्यात दाखवून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चेतन घटनेच्या दिवशी नीरज सोबत मोबाईलची अदलाबदल केली होती. नीरजने दिवसभर चेतनचे फोन स्वीकारले तर चेतन नीरजचा फोन घेऊन लोहगडाला गेला. मात्र पोलिसांच्या तांत्रिक तपासात नीरजच्या मोबाईलचे लोहगड येतील लोकेशन समोर आल्याने चेतनचा हा बनाव उघडकीस आला.