Raj Thackeray on Vishwas Nangare Patil: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएस अधिकारी आणि नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर सडकून प्रहार केला आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात उपस्थित राहून जोरदार कौतुक केलं होतं. त्यांच्या याच केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना, “तुम्हाला संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल, तर पोलीस सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा,” असा थेट आणि जाहीर सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे. सध्या राजकीय मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी ‘पुनर्वसन हमी योजना’ सुरूच आहे, त्यामुळे तुमचीही सोय होईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये जा
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत विश्वास नांगरे पाटील यांच्या दुहेरी निष्ठेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, जर एखाद्या अधिकाऱ्याला विशिष्ट विचारसरणीबद्दल एवढीच आत्मीयता असेल, तर त्यांनी वर्दीत राहून ती दाखवू नये. राज ठाकरेंनी लिहिले, “तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.” पोलीस दलाच्या वर्दीचा खाकी रंग हा पोलिसांचा आहे की संघाच्या आधीच्या हाफ चड्डीच्या खाकीचा, असा खोचक सवालही त्यांनी केला.
तर लोकांनी बघायचं कोणाकडे?
विश्वास नांगरे पाटील हे एक कार्यक्षम आणि चांगले अधिकारी म्हणून ओळखले जातात, मात्र त्यांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी राजकीय पक्ष किंवा संघटनांसमोर गहाण ठेवू नये, अशी विनंती राज ठाकरेंनी केली आहे. सद्यस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, आज आमदार-खासदार यांना धाक दाखवून ‘आमच्याकडे या’ म्हणलं की पळत जावं लागतं अशी परिस्थिती आहे. विरोधी लोकप्रतिनिधी उरलेत की नाही अशी शंका असताना, आता जर सरकारी आणि पोलीस अधिकारीही आपली निष्पक्षता सोडणार असतील, तर सामान्य जनतेने न्याय आणि सुरक्षेसाठी कोणाकडे पाहायचे, असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सरकार नांगरे पाटलांना सक्तीच्या रजेवर पाठवणार का?
या प्रकरणी राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या भूमिकेवर बोट ठेवले आहे. 2012 मधील एका घटनेचा दाखला देत त्यांनी सरकारला कोंडीत पकडले. 2012 मध्ये रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल एका पोलीस कॉन्स्टेबलने मनसेचे अभिनंदन केले होते. त्यावर तत्कालीन सरकारने ‘निष्पक्षता सोडली’ म्हणून त्या कॉन्स्टेबलला सक्तीच्या रजेवर पाठवले होते. मग हाच नियम आणि हीच भूमिका सध्याचे सरकार विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबत घेणार का? की ही दुहेरी निष्ठा सरकारला संमती आहे, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
चुकीचे पायंडे पाडू नका; सत्ताधाऱ्यांना भविष्याचा इशारा
सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून या प्रकरणावर होत असलेल्या मौनाचा अर्थ ‘समर्थन’ असाच निघतो, असे सांगत राज ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका!” असा थेट इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. कोणत्याही राजकीय पक्षाने काय कार्यक्रम घ्यावेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असला, तरी एका जबाबदार सरकारी आणि पोलीस अधिकाऱ्याने अशा राजकीय हेतू असलेल्या हिंदू संमेलनात जाऊन संघाच्या संस्थापकांवर स्तुतिसुमने उधळणे अत्यंत चुकीचे आहे. राजकीय फायद्यासाठी चुकीचे पायंडे पाडून आपण भविष्यातील पिढ्यांसमोर काय वाढून ठेवत आहोत, याचे भान सत्ताधाऱ्यांनी विसरू नये, असेही ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!