प्रभू श्रीराम भोंदूंच्या गराड्यात सापडले, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना ‘भाजप मुक्त राम’ मोहीम हाती हाती घेईल, त्याची पहिली ठिणगी आंदोलनाच्या रुपात महाराष्ट्रात पडेल; उद्धव ठाकरेंचा एल्गार


Uddhav Thackeray: प्रभू श्रीराम सध्या भोंदू लोकांच्या गराड्यात सापडले असून, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेनेला आता ‘भाजपा मुक्त राम’ ही मोहीम हाती घ्यावी लागेल आणि त्यासाठी महाराष्ट्रभरात पहिली ठिणगी टाकून आंदोलन सुरू केले जाईल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. नीट (NEET) पेपरफुटी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार, पीक विम्याची अपूर्णता आणि राम मंदिराच्या नावाखाली होणारी लूट या मुद्द्यांवर संसदेत तोंड उघडण्याचे धाडस गद्दारांच्या रक्तात उरले आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गद्दारांमध्ये राजीनामा देण्याची हिंमत नाही, त्यामुळे दोन किंवा तीन वर्षांनी जेव्हा केव्हा निवडणुका होतील, तेव्हा पुन्हा एकदा शिवसेनेचाच कट्टर खासदार निवडून आणण्यासाठी आजपासूनच पूर्ण ताकदीने तयारीला लागा. जोपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक आणि जनता सोबत आहे, तोपर्यंत कोणी कितीही प्रयत्न केले तरी ठाकरे आणि शिवसेना ही संघटना कोणीही संपवू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात सभांची सुरुवात केली असून आज यवतमाळमध्ये त्यांची तोफ धडाडली. 

मोदी शाहांचा राजकीय जन्म झाला असता का?

लोकमान्य टिळक किंवा महात्मा गांधी यांनी कधी ‘विकास निधी मिळत नाही’ म्हणून चळवळ थांबवली नव्हती. तसेच, भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी काँग्रेसविरोधात शून्यातून संघर्ष केला. त्यांनी कधी निधीसाठी पक्षांतर केले नाही. जर त्यांनी त्या काळात निधीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असता, तर आज मोदी शाहांचा राजकीय जन्म झाला असता का? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी आज केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, विकास निधी भाजपच्या वडिलांच्या मालकीचा नाही. विरोधी पक्षांचे खासदार जिथून निवडून आले आहेत, त्या मतदारसंघातही भाजपचे मतदार राहतात. तसेच, भाजपला मतदान न करणारी कोट्यवधी जनता याच देशातील नागरिक आहे, ती काय पाकिस्तानमधून आलेली नाही, असे ते म्हणाले. समाजसुधारणा करण्यासाठी कोणत्याही सरकारी विकास निधीची किंवा सत्तेची गरज नसते, हे विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा यांनी दाखवून दिले. त्यांनी कोणतेही आमदार-खासदार पद न भोगता केवळ आपल्या समाजकार्यातून लोकांच्या मनात स्थान मिळवले. आज लोक सत्ताधाऱ्यांपेक्षा या संतांना अधिक मानतात.

तू माझ्याशी गद्दारी का केलीस? 

उद्धव ठाकरे म्हणाले, मतदारांनी रक्ताचे पाणी करून आणि स्वतःचे रक्त आटवून ज्यांना निवडून दिले, त्यांनी पैशांसाठी गद्दारी केली. त्यामुळे हा गद्दार जिथे सापडेल तिथे त्याला “तू माझ्याशी गद्दारी का केलीस?” असा थेट जाब विचारला पाहिजे. त्यांनी सांगितले की, दोन आठवड्यांपूर्वी खासदारांच्या बैठकीवेळी एका गद्दार खासदाराने ‘मुलीची सोयरीक जुळवायची आहे’ असा खोटा बहाणा करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी मागितली, पण प्रत्यक्षात तो स्वतःचीच ‘सोयरीक’ जुळवून गद्दारांच्या कळपात निघून गेला, अशी टीका केली. शिवसेना सोडण्यापूर्वी हे लोक वाघासारखे स्वाभिमानी जीवन जगत होते, पण आता ते गद्दारांच्या आणि लांडग्यांच्या कळपात सामील होऊन गाढवासारखे लादलेले ओझे वाहण्याचे लाजीरवाणे जीवन जगत आहेत, असे ते म्हणाले. 

लक्ष दुसरीकडे विचलित व्हावे म्हणूनच 

आज सत्ताधाऱ्यांकडे अमाप पैसा, सत्ता आणि साधनसामग्री असली, तरी शिवसेनेकडे निष्ठावंत आणि ‘जिवंत’ माणसांची ताकद आहे, जी सर्वात मोठी आहे. सत्ताधारी हे लोकांचे मूळ प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे विचलित व्हावे म्हणूनच राजकारणात फोडाफोडी करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शेतकरी जोपर्यंत संकटात राहील, तोपर्यंतच तो सत्ताधाऱ्यांच्या दारात उभा राहील, याच विचाराने शेतकऱ्यांचे आयुष्य नेहमी संकटात ठेवले जात आहे आणि ही परिस्थिती आता बदलली पाहिजे, असे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *