Salman Khan Galexy Apartment: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) संदर्भात एक मोठी बातमी समोर येतेय. सलमान लवकरच त्याचं राहतं घर म्हणजेच बांद्र्यातील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मिळत असलेल्या बिश्नोई गँगच्या धमक्या आणि 2024 मध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सलमानने आता कुटुंबासाठी अधिक सुरक्षित आणि खासगी अशा नव्या घराची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दशकांपासून सलमान खान या अपार्टमेंटमध्ये राहतो.
मिळालेल्या माहितीनुसार, बांद्र्यातील चिंबई परिसरात समुद्रासमोर सहा मजली आलिशान इमारत उभारण्यासाठी खान कुटुंबाला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीची मंजुरी मिळाली आहे. 16 जून रोजी या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता बांधकामाची प्रक्रिया वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे नवं घर गॅलेक्सी अपार्टमेंटपासून अवघ्या काही मीटर अंतरावर असणार आहे.
बिश्नोई गँगच्या धमक्यांनतर भाईजान राहतं घर सोडण्याच्या तयारीत?
सलमान खान आणि त्यांचं कुटुंब 1974 पासून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहत आहे. बांद्र्यातील हे घर चाहत्यांसाठी मोठं आकर्षण ठरतं. याच घरात ईद आणि वाढदिवसानिमित्त सलमान बाल्कनीतून चाहत्यांना वर्षानुवर्ष भेटत आलाय. शेजारीच शाहरुख खानचं ‘मन्नत’ असल्यामुळे हा परिसर नेहमीच चर्चेत असतो. मात्र 2024 मध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन बाईकस्वारांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. तपासात या हल्लेखोरांचा संबंध बिश्नोई गँगशी जोडला गेला. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आणि त्याला Y+ सुरक्षा देण्यात आली. इतकंच नाही, तर ज्या बाल्कनीतून तो चाहत्यांना भेटत असत, त्या ठिकाणी बुलेटप्रूफ काच बसवण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, नवं घर सलमानची आई सलमा खान यांच्या मालकीच्या जागेवर उभारलं जाणार आहे. या जागेवर याआधी जुनं दोन मजली घर होतं. मात्र ते मोडकळीस आल्यानंतर पाडण्यात आलं. आता इथे ग्राउंड फ्लोअर, स्टिल्ट पार्किंग आणि सहा मजली टॉवर उभारला जाणार असून सुमारे 1014 चौरस मीटरमध्ये हा प्रकल्प साकारला जाणार आहे.
नव्या घरामुळे सलमान आणि त्यांच्या कुटुंबाला अधिक सुरक्षा, प्रयवसी आणि आराम मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या सगळ्या चर्चांवर अद्याप सलमान खान किंवा त्यांच्या टीमकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तरीही ‘भाईजान’चं नवं घर आणि गॅलेक्सी अपार्टमेंटला अलविदा करण्याची शक्यता सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष