रायगड : शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वात ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असून ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन जाहिर सभा घेतल्या जात आहेत. आधी खासदार संजय दिना पाटील यांच्या मुंबईतील मतदारसंघात, आता यवतमाळमधील संजय देशमुख यांच्या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांवर निशाणा साधला. त्यावरुन, एकनाथ शिंदेंनी पलटवार केला आहे. काय बोलणार मी, आता जाहीर सभा लावायला मीच लावलंय, मी सर्वांना कामाला लावलंय. कमाल आहे, वराती मागून घोडे, सगळे गेल्यावर हे पोहोचतात. जो हौद से गयी, ओ बुंद से नही आती, असा टोलाही शिंदेंनी ठाकरेंना लगावला.
ठाकरेंच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून या सर्वच खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होत आहे. त्यामध्ये, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या देखील मतदारसंघात सभा घेतली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ दौऱ्यासाठी नागपूरसाठी जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसां समवेत एकत्र विमान प्रवास केल्यानंतर माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात या प्रवासाची जोरदार चर्चा रंगली. शिवसेनेतील अनेकांनी या प्रवासाला केवळ योगायोग म्हटले, तर काही नेत्यांनी महाराष्ट्राची संस्कृती म्हणत ह्याकडे राजकीय हेतुने पाहणे गरजेचं नसल्याचं मत मांडलं. आता, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांच्या एकत्र प्रवासावर विमानापेक्षा इमान महत्वाचं अशी प्रतिक्रिया एका वाक्यात दिली.
कपटी मित्र घातक असतो
तुम्ही 2019 मध्ये जी बेईमानी केली, महाराष्ट्रातील जनतेने एकाच विमानातून प्रवास करण्याची संधी दिली होती, पण त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून प्रवास सुरु केला. त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत, देवेंद्रजी खुप हूशार आहेत, त्यांनी कपटी मित्र किती घातक असतो हे पाहिलंय, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी एकत्र विमानप्रवासावरुन उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
पालकमंत्रीपदाची लवकरच घोषणा
रायगडावरील शिवराज्यभिषेक सोहळा म्हणजे आज आंदोत्सव होता, असे सण कितीही साजरे केले तरी कमीच आहेत. श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार हे तुम्हाला माहिती, तुमचीच चर्चा आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही शिवरायांचे मावळे म्हणून आलो आहोत. छत्रपतींच्या आर्शिवादाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, लवकरच घोषित होईल, असे शिंदेंनी सांगितले. दरम्यान, येथील पालकमंत्री पदासाठी रायगडचे शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी सातत्याने मागणी केली असून त्यांनाच पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!