चंद्रपूर किडनी तस्करी प्रकरणी पोलिसांना मोठं यश, आरोपी डॉ. रवींद्र पाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात जोरदार युक्तीवाद 


Chandrapur Kidney Racket News : बहुचर्चित आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेल्या किडनी तस्करी प्रकरणात चंद्रपूर पोलिसांना मोठं यश आलं आहे. कोर्टाने डॉ. रवींद्र पाल सिंगला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ब्रम्हपुरी न्यायालयात आज आरोपी रविंद्र पाल सिंग आणि पोलिसांच्या वकिलांमध्ये तीन तास जोरदार युक्तिवाद चालला. आरोपीला जास्तीत जास्त दिवसांची कोठडी मिळावी आणि या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सखोल तपास करता यावा यासाठी पोलिसांनी आपल्याकडील सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केले. 

या रॅकेटमध्ये आणखी कोणत्या बड्या डॉक्टरांचा किंवा दलालांचा समावेश याची माहिती उघड होणार

गुन्ह्याचे गांभीर्य आणि आरोपीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील लागेबंधे लक्षात घेता सरकारी वकिलांनी न्यायालयात जवळपास तीन तास युक्तिवाद केला. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य विषद करणारे तब्बल 35 मुद्दे न्यायालयासमोर मांडले. आरोपीच्या वकिलांनी पोलिसांचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी सादर केलेले ठोस पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीची पोलीस कस्टडी मिळाल्यामुळे या आरोपींनी आतापर्यंत किती जणांची किडनी काढली, या रॅकेटमध्ये आणखी कोणत्या बड्या डॉक्टरांचा किंवा दलालांचा समावेश आहे, आर्थिक व्यवहारांची देवाणघेवाण कशी आणि कुठे झाली यांसारख्या अनेक मोठ्या आणि धक्कादायक बाबींचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रकरणाच्या तपासाला पुन्हा वेग येण्याची शक्यता

देशभरात चर्चेत आलेल्या रोशन कुळे मूत्रपिंड विक्री प्रकरणाला बुधवारी नवे नाट्यमय वळण मिळाले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले दिल्ली येथील डॉ. रवींद्र पाल सिंग यांनी अखेर ब्रह्मपुरी न्यायालयात हजर होत आत्मसमर्पण केले होते. न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळं या गाजलेल्या प्रकरणाच्या तपासाला पुन्हा वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय रॅकेटबाबत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता

तपासात तामिळनाडूतील त्रिची येथील डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी आणि दिल्लीतील डॉ. सिंग यांच्या रुग्णालयांमध्ये बेकायदेशीर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सुमारे महिनाभराने डॉ. सिंग यांनी ब्रह्मपुरी न्यायालयात शरणागती पत्करली होती. त्यांच्या पोलिस कोठडीदरम्यान या आंतरराष्ट्रीय रॅकेटबाबत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *