Eknath Khadse and Vinod Tawde: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात मुंबईत एक महत्त्वपूर्ण भेट झाली आहे. या भेटीमुळे राजकारणात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी प्रचंड जोर धरला आहे. विशेष म्हणजे, या भेटीमागे उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा प्रभाव कमी करण्याची दिल्लीची खेळी तर नाही ना? अशी नवी चर्चा आता सुरू झाली आहे.
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्याशी सविस्तर चर्चा झाली होती. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचा या प्रवेशाला हिरवा कंदील असूनही, राज्यातील काही बड्या नेत्यांच्या विरोधामुळे हा प्रवेश रखडल्याचे बोलले जात होते. अशातच आता थेट दिल्लीतील वजनदार नेते विनोद तावडे यांनी खडसेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन यांचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने ही चाल खेळल्याची जोरदार चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये रंगली आहे.
Eknath Khadse: भाजप प्रवेशाच्या चर्चांवर खडसेंचे स्पष्टीकरण
या भेटीनंतर तर्क-वितर्क लढवले जात असतानाच, आमदार एकनाथ खडसे यांनी मात्र या सर्व चर्चांचे पूर्णपणे खंडन केले असून या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. खडसे म्हणाले की, “विनोद तावडे हे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुंबईतील निवासस्थानी आले होते, त्यावेळी ही भेट झाली. ही कोणतीही राजकीय भेट नव्हती, तर केवळ माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घेतलेली ती एक सदिच्छा भेट होती.”
Eknath Khadse: 40 वर्षांची साथ आणि फडणवीस-महाजन यांच्याशी मतभेद
जवळपास 40 वर्षे भाजप पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेल्या एकनाथ खडसे यांना मागील काळात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या तीव्र मतभेदांमुळे (Differences) पक्ष सोडण्याची वेळ आली होती, असा थेट आरोप स्वतः खडसे यांनी केला होता. भाजप सोडल्यानंतर खडसे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि आमदारकी (MLA) मिळवण्यात यश मिळवले. मात्र, विरोधी पक्षात राहिल्यामुळे आपल्याला सत्ताधारी पक्षाकडून अनेक प्रकरणांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खडसे यांनी अनेकदा केला आहे.
Eknath Khadse: भाजपमध्ये प्रवेशासाठी वाढदिवसाचा मुहूर्त?
या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे असेल, तर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणे हाच एकमेव मार्ग असल्याचे त्यांच्या समर्थकांना वाटत आहे. म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून खडसे यांनी फडणवीस किंवा महाजन यांच्यावर थेट वैयक्तिक टीका करणे टाळले आहे. तसेच त्यांच्या सून रक्षा खडसे यांनीही या नेत्यांमधील कटुता कमी करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. त्यातच आता विनोद तावडे यांच्याशी झालेल्या भेटीमुळे खडसे यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
विनोद तावडे आणि खडसे यांच्या या भेटीमुळे भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा कितीही जोरात असल्या, तरी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मिळालेली आमदारकी सोडून ते तातडीने भाजपमध्ये जाण्याची जोखीम पत्करण्याची शक्यता खूपच कमी आहे, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून