Donald Trump On Iran: ट्रम्प यांची मोठी घोषणा, आज रात्री अमेरिका-इराणमध्ये काय घडणार? भारताची धाकधूक वाढली | मराठी बातम्या (Latest Marathi News)


Last Updated:

Donald Trump On Iran : पश्चिम आशियामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून असलेला तणाव आणि युद्ध आता संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ट्रम्प यांची मोठी घोषणा, आज रात्री अमेरिका-इराणमध्ये काय घडणार? भारताची धाकधूक वाढली
ट्रम्प यांची मोठी घोषणा, आज रात्री अमेरिका-इराणमध्ये काय घडणार? भारताची धाकधूक वाढली

वॉशिंग्टन: पश्चिम आशियामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून असलेला तणाव आणि युद्ध आता संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या संघर्षाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. अमेरिका आणि इराण दरम्यान आज, रविवारी शांतता करारावर स्वाक्षरी केली जाणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. इराणसोबतच्या करारानंतर जगातील सर्वात महत्त्वाची सागरी जीवनवाहिनी मानली जाणारी ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ (होर्मुजची सामुद्रधुनी) तातडीने व्यापारासाठी खुली केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, “उद्या करारावर स्वाक्षरी होणार असून त्यानंतर लगेचच होर्मुजची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली होईल. इराणसोबतचे आमचे संबंध आता मागील सरकारांच्या तुलनेत अधिक सुधारले आहेत.”

युरेनियम नष्ट करणार, ट्रम्प यांचा निर्धार

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये इराणच्या अणू कार्यक्रमाचाही उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, अमेरिका इराणमधील अणू साहित्य ताब्यात घेऊन ते नष्ट करेल. “परिस्थिती पूर्णपणे शांत झाल्यावर आम्ही खोलवर गाडलेली Nuclear Dust बाहेर काढू आणि ती नष्ट करू, मग ती इराणमध्ये असो वा अमेरिकेत,” असे ट्रम्प यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी अमेरिकन बी-२ बॉम्बर्स आणि वैमानिकांचे कौतुकही केले.

इराणची भूमिका काय?

ट्रम्प यांच्या दाव्याच्या काही तास आधी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने कराराच्या वेळेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघाई यांनी सांगितले की, रविवारी ‘इस्लामाबाद मेमोरँडम’वर स्वाक्षरी होणार नाही. मात्र, आगामी काळात करार होण्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही. “कोणत्याही तारखेबद्दल भाष्य करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे,” असे बघाई म्हणाले.

आता करार ‘ऑनलाइन’ होणार

सुरुवातीला हा करार युरोपमध्ये समोरासमोर होणार होता आणि त्यासाठी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हॅन्स उपस्थित राहणार होते. मात्र, आता सुरक्षेच्या कारणास्तव आणि व्यस्त कार्यक्रमामुळे दोन्ही देश इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी (Digital Signature) करणार आहेत. अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी एका व्हर्च्युअल बैठकीत या करारावर शिक्कामोर्तब करतील. या मध्यस्थीमध्ये पाकिस्तान आणि कतारने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *