दिग्गज नेमबाज जसपाल राणा यांचं निधन, 49 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; क्रीडा विश्वावर शोककळा – Marathi News | Former indian shooter jaspal rana died due to heart attack details inside


आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी पदक विजेते आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. नेमबाजीतून निवृत्त झाल्यानंतर ते प्रशिक्षक म्हणून काम करत होते. जसपाल राणा यांच्या निधनाच्या वृत्ताने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते भारतीय संघाच्या दमदार कामगिरीनंतर म्युनिकहून भारतात परतले होते. म्युनिकहून दिल्लीला प्रवास करत असताना जसपाल यांची प्रकृती बिघडली. दिल्लीला पोहोचल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने थेट विमानतळावरून साकेत इथल्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान आज (शुक्रवार) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

द्रोणाचार्य पुरस्कार विजेते जसपाल राणा यांनी भारतीय नेमबाजीला उच्च स्तरावर नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. देशासाठी अनेक पदकं जिंकल्यानंतर त्यांनी भारतीय पिस्तूल नेमबाजांच्या नवीन पिढीला प्रशिक्षणही दिलं. फेब्रुवारी 2025 मध्ये एनआरएआयने (NRAI) त्यांची 25 मीटर पिस्तूल प्रकारासाठी उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने म्युनिक विश्वचषक स्पर्धेत दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह चार पदकं जिंकून उत्कृष्ट कामगिरी केली.

2012 पासून ज्युनियर पिस्तूल प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जसपाल यांनी सौरभ चौधरी, अनिश भानवाला आणि चिंकी यादव यांसारख्या तरुण नेमबाजांना घडवलं. तर स्टार नेमबाज मनू भाकरलाही त्यांनीच मार्गदर्शन केलं. जसपाल राणा यांच्या कठोर प्रशिक्षण आणि मार्गदर्शनामुळे मनू भाकरने 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदकं जिंकली होती. क्रीडा क्षेत्रातील या उत्कृष्ट योगदानाची दखल घेऊन भारत सरकारन 2020 मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.

राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला शोक

जसपाल राणा यांनी आशियाई क्रीड स्पर्धेत चार सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण आठ पदकं जिंकली होती. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्यांनी 1994 च्या हिरोशिमा आशियाई क्रीडा स्पर्धेत 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून आपल्या शानदार कारकिर्दीची सुरुवात केली होती.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ‘जसपाल राणा हे उत्कृष्ट खेळाडू आणि प्रशिक्षक होते. त्याचसोबत ते अत्यंत साधे आणि दयाळू व्यक्ती होते. भारतात नेमबाजी या खेळाला लोकप्रिय करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली’, असं त्यांनी लिहिलं.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *