Delimitation Bill NCP SP Stand : संसदेच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘डिलिमिटेशन’ म्हणजेच ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयका’वरून (Delimitation Bill) राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाअंतर्गत या विधेयकावरून दोन वेगवेगळे मतप्रवाह समोर आल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
एकीकडे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या विधेयकावर संसदेत सकारात्मक चर्चेची तयारी दाखवली आहे, तर दुसरीकडे त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या विधेयकाला कडाडून विरोध करत थेट ‘बंडाचे’ निशाण फडकवले आहे.
सत्ताधाऱ्यांचा संविधानावर घाला घालण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा हा छुपा डाव असल्याचा आरोप करत रोहित पवारांनी कोणत्याही परिस्थितीत या विधेयकाला पाठिंबा न देण्याचे आवाहन विरोधकांना केले आहे. त्यामुळे अधिवेशनात शरद पवारांचा पक्ष नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Rohit Pawar Tweet On Delimitation : ‘आमिष दाखवून मतदारसंघांची तोडफोड करणार’
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहीत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार म्हणाले की, “उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) ‘डिलिमिटेशन विधेयक’ मंजूर करून घेणे, हाच सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू आहे. यासाठी गोड बोलून राज्यांना 50 टक्के जागा वाढवून देण्याचे आमिष दाखवले जाऊ शकते. मात्र, या आकड्यांच्या जाळ्यात अडकून जर आपण या विधेयकाला पाठिंबा दिला, तर महापालिका निवडणुकीतील प्रभाग रचनेप्रमाणेच लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघांचीही केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी तोडफोड केली जाईल.”
Assam Delimitation Row BJP Strategy : आसामचे उदाहरण देत भाजपच्या रणनीतीवर टीका
आपल्या पोस्टमध्ये पुढे बोलताना रोहित पवारांनी आसामचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, “भौगोलिक सीमा किंवा घटनात्मक चौकटीचा विचार न करता केवळ सत्ता कायम राखण्यासाठी ही पुनर्रचना केली जाईल. आसाममधील मतदारसंघाची पुनर्रचना हे याचे उत्तम उदाहरण आहे. सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी 2016 पासूनच अनुभवी माजी अधिकाऱ्यांच्या मदतीने कोणत्या मतदारसंघाची कशी तोडफोड करायची, याची रणनीती भाजपाने आधीपासूनच आखली आहे. आता केवळ हे विधेयक मंजूर होण्याची त्यांना प्रतीक्षा आहे. तोपर्यंत विरोधकांशी सलोख्याचे नाटक केले जाईल. विधेयक मंजूर होताच हुकूमशाही प्रवृत्ती पुन्हा उफाळून येईल. संविधानावर घाला घालण्यासाठी एका बाजूला डिलिमिटेशन आणि दुसऱ्या बाजूला SIR अशी जोरदार तयारी सुरू आहे. हा डाव आपण एकजुटीने उधळून लावला पाहिजे.”
उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ‘डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक’ मंजूर करून घेणं, हाच सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू आहे. यासाठी गोड बोलून राज्यांना ५० टक्के जागा वाढवून देण्याचं आमिष दाखवलं जाऊ शकतं.. मात्र, या आकड्यांच्या जाळ्यात अडकून जर आपण या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 19, 2026
रोहित पवारांनी या विधेयकाविरोधात अत्यंत आक्रमक आणि थेट विरोधाची भूमिका घेतली असताना, खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र संसदीय लोकशाहीच्या चौकटीत राहून या विषयावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.
Apna Time Aayega Rohit Pawar Message : संघर्ष करायचा की तडजोड?
रोहित पवारांनी विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन करताना शेवटी लिहिले की, “देशातील तरुणांनीच परिवर्तन घडवण्याचा आता निर्धार केला आहे, तर त्यांना आपण प्रामाणिक साथ दिली पाहिजे. संघर्ष करायचा की तडजोड? हा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा. आता ‘अपना टाईम आएगा’ म्हणत थांबण्याची वेळ नाही, तर ‘अपना टाईम आ गया’ हा विश्वास बाळगून विरोधकांनी एकजुटीने आणि खंबीरपणे निर्णय घेण्याची गरज आहे.” आता या अंतर्गत मतभेदांनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस संसदेच्या पटलावर नेमके काय पाऊल उचलते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा:
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम