Last Updated:
Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ड्रग्स आणि अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात महायुती सरकारने आता अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे.
मुंबई: महाराष्ट्रातील ड्रग्स आणि अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात महायुती सरकारने आता अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. राज्यातील ड्रग्सचे जाळे मुळासकट उपटून टाकण्यासाठी माहिती देणाऱ्या नागरिकांना मोठे बक्षीस दिले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. यासोबतच, माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख १०० टक्के गुप्त ठेवली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
नागरिकांना पुढे येण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
विधानसभेत राज्यातील ड्रग्सच्या समस्येवरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची कठोर भूमिका स्पष्ट केली. “ड्रग्स माफियांचा सुळसुळाट आणि अमली पदार्थांचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या लढाईत नागरिकांनीही पुढे यावे. ज्या ठिकाणी ड्रग्सची विक्री किंवा तस्करी होते, त्याची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्यांना योग्य ते बक्षीस दिले जाईल,” असे फडणवीस म्हणाले.
ड्रग्सचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आदेश
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले की, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांमध्येही धाडी टाकून ड्रग्स तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ज्या ज्या भागात ड्रग्स आणि नार्कोटिक्सची विक्री केली जाते, ते सर्व अड्डे हुडकून काढून ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचे थेट आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच तरुणाईला या विळख्यातून वाचवण्यासाठी विशेष जनजागृती मोहिमाही राबवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार सुनील प्रभू यांनी वेधले लक्ष
यापूर्वी विधानसभेत बोलताना शिवसेना (ठाकरे गट) आमदार सुनील प्रभू यांनी राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या प्रमाणावर तीव्र चिंता व्यक्त केली होती. “राज्यातील तरुणांचे भवितव्य अंधारात जात असून, ड्रग्सची विक्री करणारे आणि त्याचे सेवन करणारे या दोघांवरही कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. राज्यातून ड्रग्सचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने तातडीने आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी प्रभू यांनी सभागृहात लावून धरली होती.
Mumbai,Maharashtra
