Last Updated:
नेरळ-माथेरान घाटातील जुम्मा पट्टी येथील S टर्नवर सुरक्षा रेलिंग मोडून दरी उघडी, रस्ता खड्ड्यांनी भरला, नागरिकांनी तातडीने दुरुस्ती व मजबूत भिंतीची मागणी केली
निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही माथेरानला जाण्याचा बेत आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. माथेरानला जोडणाऱ्या एकमेव ‘नेरळ-माथेरान’ घाट रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे सध्या साक्षात यमदेवाला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. त्यामुळे बचके रहना रे बाबा सारखी स्थिती या रस्त्यावरुन जाताना आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अत्यंत निष्काळजी कारभारामुळे या घाटातील प्रसिद्ध आणि अवघड मानला जाणारा एस टर्न सध्या खऱ्या अर्थाने प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.
घाटातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जुम्मा पट्टी इथे लागणारा हा S टर्न अत्यंत तीव्र चढ-उताराचा आणि अवघड वळणाचा आहे. या धोकादायक वळणावर वाहनांचा ताबा सुटू नये आणि गाड्या थेट दरीत कोसळू नयेत म्हणून लोखंडी सुरक्षा रेलिंग बसवण्यात आले होते. मात्र, सध्या या ठिकाणी खूप मोठी दुरावस्था झाली आहे. त्याकडे कुणी लक्षही दिलेलं नाही.
लोखंडी सुरक्षा रेलिंग अक्षरशः मोडून-दुमडून जमिनीवर पडले आहेत. त्यामुळे दरीची बाजू पूर्णपणे उघडी झाली आहे. नवीन वाहन चालकांना या तीव्र वळणाचा आणि चढाचा अंदाज येत नाही. गाडी चढवताना ती अचानक मागे आल्यास किंवा चालकाचा ताबा सुटल्यास, गाडी थेट दरीत कोसळण्यापासून रोखण्यासाठी तिथे एक वीतभरही सुरक्षा भिंत शिल्लक राहिलेली नाही.
माथेरान घाटाच्या सुरक्षेसाठी आणि रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. मात्र, हा निधी नक्की कोणाच्या खिशात गेला? असा संतप्त सवाल आता पर्यटक आणि स्थानिक नागरिक विचारत आहेत. सध्या या संपूर्ण घाटात ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची पार चाळण झाली आहे. खराब रस्त्यामुळे अवघड चढावर गाड्यांचा वेग कमी होतो, परिणामी वाहने बंद पडून मागे घसरण्याच्या घटना घडत आहेत.
“एखाद्या मोठ्या अपघातात पर्यटकांचा किंवा स्थानिकांचा बळी गेल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का?” असा तीव्र संताप माथेरानमधील नागरिकांमधून व्यक्त होत आहे. हा अवघड रस्ता अधिक रुंद करण्यात यावा, येथील तीव्र चढ कमी केला जावा आणि तातडीने मजबूत सुरक्षा भिंत उभारली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पावसाळा तोंडावर आलेला असताना या घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती झाली नाही, तर माथेरानचे स्थानिक रहिवासी प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना स्वतःच्या जीवाची काळजी स्वतःच घ्या, अशीच सध्याची भीषण परिस्थिती आहे.
Mumbai,Maharashtra
