बीड : जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये, मी सहज डिवचायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. तुमची दादागिरी आणि नौटंकी तिकडे चालवायची, इकडे बीडमध्ये नाही, अशा अत्यंत आक्रमक आणि कडक शब्दांत भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना जाहीर आव्हान दिलं. दुधाच्या दराच्या आणि इतर प्रश्नांवरून जयंत पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात केलेल्या आरोपांना उत्तर देताना सुरेश धस यांनी बीडच्या मच्छिंद्रनाथ गडावर (Machhindranath Gad) माध्यमांशी बोलताना हा थेट इशारा दिला. यामुळे बीडसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
Suresh Dhas Vs Jayant Patil : जयंत पाटलांवर टीका
जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधताना सुरेश धस पुढे म्हणाले, “तुम्हाला पाहून बाकीचे लोक गप्प बसत असतील, पण आम्ही गप्प बसणार नाही. देवाने तुम्हाला जेवढे डोकं दिले आहे, त्यापेक्षा एक टक्का आमच्या देवाने आम्हाला जास्त डोकं दिले आहे. तुम्ही आमच्या भागात येऊन आम्हाला डिवचण्याचे काम करताय, मग आम्हीही तुमच्या भागात येऊन तुम्हाला डिवचू.”
Jio Tagging Issue : जिओ टॅगिंगच्या नावाखाली लूट, धसांचा आरोप
सुरेश धस यांनी केवळ राजकीय इशाराच दिला नाही, तर महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळातील जलसंपदा विभागाच्या कारभारावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “मविआ सरकारच्या काळात कोण जलसंपदा मंत्री (Water Resources Minister) होते? ज्यांच्या कालावधीत ‘जिओ टॅगिंग’चा (Geo Tagging) जीआर काढला गेला आणि त्याच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्राची मोठी लूट झाली. हा नेमका काय प्रकार होता, हे येत्या पुढच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी सर्वांसमोर आणणार.”
Mahalaxmi Sanstha : महालक्ष्मी संस्था कोणाची? सगळी कुंडली काढणार
सुरेश धस यांनी पुढे बोलताना ‘महालक्ष्मी’ नावाच्या एका संस्थेचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांवर निशाणा साधला. “महालक्ष्मी सारखी संस्था नेमकी कोणाची आहे? त्याचे रजिस्ट्रेशन कोणाच्या नावावर आहे? त्या संस्थेमध्ये कोणाचा किती वाटा आहे आणि तिचे डायरेक्टर कोण कोण आहेत? ही सगळी माहिती आणि कुंडली मी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाहेर काढणार.”
धस यांच्या या अत्यंत आक्रमक पवित्र्यामुळे आगामी अधिवेशनात जलसंपदा विभागाचे ‘जिओ टॅगिंग’ आणि ‘महालक्ष्मी संस्था’ या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही बातमी वाचा:
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से