धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय


नागपूर : मुलाच्या ऑपरेशनसाठी तुरुंगातून पेरोलवर सुटलेला आरोपी पोलिसांच्या (Police) डोळ्यात धुळफेक करुन मुलाच्या ऑपरेशनपूर्वीच पुन्हा स्वत:हून तुरुंगात जाऊन जमा झाला. माझा पेरोल घेण्याचा उद्दिष्ट पूर्ण झाला आहे, आता मला तुरुंगातच ठेवा, असे म्हणत आरोपी अफरोज उर्फ भाईजान पठाणने पेरोलवरुन तुरुंगात जाणे पसंत केले. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील फुकेश्वर भागात चाकूचा धाक दाखवत एका कुटुंबाला लुटणाऱ्या गुन्ह्यात हाच आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे अखेर पोलिसांच्या तपासातून समोर आले. नागपूर ग्रामीण पोलिसांपासून वाचण्यासाठीच त्याने असा डाव रचला होता. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासापुढे त्याचं काहीच चाललं नाही आणि अखेर तुरुंगात जाऊन लपू पाहणाऱ्या त्या गुन्हेगाराला लुटीच्या गुन्ह्यातही अटक झाली. 

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस स्टेशन अंतर्गत फुकेश्वर शिवारात 5 जुलैच्या संध्याकाळी अफरोज उर्फ भाईजान पठाण या पेरोलवर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने त्याच्या एका सहकारी गुन्हेगाराससह चाकूचा धाक दाखवत सुहास हजारे या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यासह लुटले होते. आपल्या कुटुंबासह ते कारने जात असताना त्यांची लूट करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे लुटीच्या या घटनेतील प्रमुख आरोपी “अफरोज उर्फ भाईजान पठाण” हा अमरावती तुरुंगातून पेरोलवर बाहेर आला होता, आणि पेरोलवर असताना त्याने आणखी एका गुन्हेगाराच्या मदतीने ही लूट केली होती.

लुटीच्या घटनेच्या वेळेला मागच्या सीटवर बसलेल्या हजारे यांच्या मुलीने लुटीची संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रित केली होती. मोबाईल फुटेजमध्ये दिसत असलेल्या चेहऱ्यांचा शोध घेत पोलिसांनी घटनास्थळापासून 25 किलोमीटरच्या संपूर्ण परिसरातील प्रत्येक सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्याच्या आधारावर पोलीस अफरोज उर्फ भाईजान पठाणच्या खरबी परिसरात जाऊन पोहोचले. अफरोज पठाणचा फोटो दाखवत पोलीस त्या भागात शोध घेत असताना त्याची माहिती अफरोज पठाणला मिळाली. माहिती मिळताच आपल्या मुलाच्या ऑपरेशन साठी एक महिन्याच्या पेरोलवर अमरावती तुरुंगातून सुटलेल्या अफरोज पठाण ने लगेच तुरुंगात जाण्याचा निर्णय घेतला आणि 11 जुलै च्या रात्री ( 10 आणि 11 जुलै ची मध्य रात्र) अमरावती तुरुंगात जाऊन मी पेरोल वरून परत आलो, माझे काम संपले, आता मला तुरुंगात घ्या अशी विनंती करत स्वतःहून तुरुंगात जमा झाला. (तुरुंग अधिकाऱ्यांना अफरोजने बाहेर काय प्रताप केले आहे याची माहिती नसल्यामुळे त्यांनी त्याला तुरुंगात जमा करून घेतले …)

पोलिसांपुढे अफरोजचे बिंग फुटले

दरम्यान, नागपूर पोलीस लुटीच्या घटनेचा शोध घेत अफरोज पठाणच्या घरापर्यंत पोहोचल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी तो तर अनेक दिवसांपासून तुरुंगात असल्याचा बनाव केला. नागपूर पोलिसांनी अमरावती तुरुंग प्रशासनाशी संपर्क साधल्यावर अफरोज पठाणचं बिंग फुटलं. तो पेरोलवर बाहेर होता आणि 11 जुलै च्या रात्री तो तुरुंगात पोहोचल्याचे स्पष्ट झाले. नागपूर पोलिसांनी अमरावती तुरुंगातून अफरोज पठाणला लुटीच्या घटनेत ताब्यात घेतले आहे.. त्याच्या सहकार्यालाही वाठोडा परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी सराईत गुन्हेगाराने चक्क तुरुंगातच लपण्याचा डाव रचला होता. मात्र, पोलिसांसमोर त्याचा हाड डाव अपयशी ठरल्याचे उघडकीस आले. 

हेही वाचा

मुलगी झाल्यामुळे सासरच्यांनी कोल्हापूरात विवाहितेला संपवल्याचा आरोप, नवरा, सासू-सासरे अन् नणंदेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *