‘मैं कौन हूं, तू जानता नहीं, कुर्ला में..’ मुलगा आणि आईवर जीवघेणा हल्ला, मिरारोडमधील घटना | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

एका अनोळखी तरुणाने शफातला ढकलून खाली पाडलं. त्यानंतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी आणि ठोसे मारून बेदम मारहाण केली.

News18
News18

मिरा रोड : मुंबईजवळील मिरा रोड भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पटेल कॉम्प्लेक्स परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादाचे हिंसक रूप धारण करत 21 वर्षीय तरुण आणि त्याच्या आईवर चौघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शफात शहबाज उस्मानी (वय 21) हा मित्रासोबत बर्गमन स्कूटरवरून फिरून आपल्या सोसायटीत परतला होता. स्कूटर पार्क करत असताना समोरील मेविश टॉवरमध्ये राहणाऱ्या सुलतान नासिर खान याने “येथे गाडी पार्क करू नको, ही जागा आमची आहे,” असं म्हणत वाद घातला. यावेळी त्याने शफातच्या कानशिलात लगावली. त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी तरुणाने शफातला ढकलून खाली पाडलं. त्यानंतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी आणि ठोसे मारून बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असताना सुलतानने “मैं कौन हूं, तू जानता नहीं… कुर्ला में जाकर पूछ लेना, तेरी कुंडली निकाल दूंगा,” अशी धमकी देत दहशत निर्माण केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.

आईला धक्काबुक्की

शफातने आरडाओरडा केल्यानंतर त्याची आई शबनम उस्मानी या मुलाला वाचवण्यासाठी घटनास्थळी धावून आल्या. मात्र त्यावेळी सुलतानचा वडील नासिर खान आणि भाऊ अल्तमश खान हेही घटनास्थळी पोहोचले. तक्रारीनुसार, चौघांनी मिळून आई-मुलाला शिवीगाळ करत मारहाण सुरूच ठेवली. सुलतानने शबनम उस्मानी यांच्या छातीवर हात लावून जोराचा धक्का दिल्याने त्या खाली कोसळल्या. या मारहाणीत त्यांच्या कानाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला तसंच ऐकण्यास त्रास सुरू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

जखमींना प्रथम शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी काशिमीरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मोहम्मद शफात उस्मानी यांच्या तक्रारीवरून काशिमीरा पोलिसांनी सुलतान नासिर खान, नासिर खान, अल्तमश खान आणि एका अनोळखी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 74, 115(2), 351(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

‘मैं कौन हूं, तू जानता नहीं, कुर्ला में..’ मुलगा आणि आईवर जीवघेणा हल्ला, मिरारोडमधील घटना



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *