Abhijeet Dipke  : म्हाताऱ्या लोकांनी निवृत्त व्हावं, आश्रमात बसावं, आमचं आम्ही ठरवू; अण्णा हजारेंचं नाव घेताच अभिजीत दीपके काय म्हणाले?


छत्रपती संभाजीनगर : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (Cockroach Janata Party) संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी ज्येष्ठ समाजसेवक आणि ज्येष्ठ आंदोलक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या वय आणि नेतृत्वावर बोट ठेवत एक अत्यंत वादग्रस्त आणि खळबळजनक वक्तव्य केले आहे. ज्या लोकांचे वय झाले आहे, अशा म्हाताऱ्या लोकांनी विद्यार्थी आणि युवकांच्या भविष्याबाबत कोणतेही निर्णय घेऊ नयेत. त्यांनी आता सामाजिक-राजकीय जीवनातून निवृत्त व्हावे आणि आश्रमात जाऊन बसावे, अशा कडक आणि तिखट शब्दांत दीपके यांनी अण्णा हजारेंवर (Anna Hazare) टीका केली.

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत अभिजीत दीपके माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना ‘तुम्ही अण्णा हजारे यांची भेट घेणार का?’ असा थेट प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना दीपके यांनी आपण अण्णा हजारे किंवा इतर कोणाचीही भेट घेणार नसल्याचं स्पष्ट केलं.

Abhijeet Dipke Statement on Anna Hazare : वयस्क लोकांनी चळवळींमधून निवृत्त व्हावे

आपली भूमिका स्पष्ट करताना अभिजीत दीपके म्हणाले की, “ज्यांचे वय 50 ते 60 वर्षांपेक्षा जास्त झाले आहे, अशा लोकांनी आता स्वतःहून सर्व सामाजिक आणि राजकीय चळवळींमधून निवृत्त झाले पाहिजे. हा प्रश्न थेट देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे आमचं काय करायचं आणि आमचं भविष्य कसं घडवायचं, हे सर्वस्वी आम्हाला म्हणजेच तरुणांना ठरवू द्या. ज्या म्हाताऱ्या लोकांचं सर्वकाही झालं आहे त्यांनी आता निवृत्त होऊन आश्रमात विश्रांती घ्यावी. त्यांनी उगाचच तरुणांच्या भवितव्याचे निर्णय घेऊ नये.” 

अभिजीत दीपके यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Cockroach Janata Party History : काय आहे ‘कॉकरोच जनता पार्टी’चा रंजक इतिहास?

काही दिवसांपूर्वी देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका प्रकरणात बेरोजगार तरुणांची तुलना उपरोधाने ‘कॉकरोच’ म्हणजेच झुरळांशी केली होती. सरन्यायाधीशांच्या याच विधानाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि त्यावर उपरोधात्मक टीका करण्यासाठी सोशल मीडियावर गमतीने ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाचे एक डिजिटल हँडल सुरू करण्यात आलं होतं.

मात्र, तरुणांच्या बेरोजगारीच्या मुद्द्याला थेट हात घातल्यामुळे अवघ्या चार दिवसांतच या डिजिटल हँडलचे फॉलोअर्स देशातील भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही राष्ट्रीय पक्षांपेक्षाही अधिक झाले. सोशल मीडियावरील या डिजिटल चळवळीला देशभरातील तरुणांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळाल्याने, आता या चळवळीने प्रत्यक्ष राजकीय आणि सामाजिक आंदोलनाचे रूप घेतले आहे.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *