मुंबई कोकणासह मराठवाड्यातही पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला, वातावरणात गारवा, कुठं-कुठं बरसला वरुणराजा?


मुंबई : जून महिना कोरडाच गेल्यानंतर आता महिनाअखेरीस मान्सूनच्या पावसाचं (Rain) दमदार आगमन झालं असून आज मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या धारा कोसळल्या. मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील (Marathwada) विविध जिल्ह्यातही मुसळधार पावसाने काही गावात पाणीच पाणी पाहायला मिळालं. तर, रायगडावरही पावसाच्या सरी कोसळल्याने निसर्गससौंदर्य खुलल्याचंही दिसून आलं. मुंबईत आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली, मुंबईसह एमएमआर क्षेत्रात पावसाचा जोर वाढणार असल्याने पुढील पाच दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वारा वाहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. 

मुंबईतील कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्राने आज दुपारी जारी केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, या काळात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मध्यरात्री पडलेल्या सरीनंतर दिवसभर पावसाने उघडीप घेतली होती. आता पुन्हा पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहे, पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मरीन ड्राईव्ह येथे हजेरी लावताना पाह्यला मिळत आहेत. तर, दुसरीकडे विविध जिल्ह्यात पावसाने नागरिक, शेतकरी सुखावल्याचे चित्र आहे. 

रत्नागिरीत मुसळधार पावसाचा जोर

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली असून आज दुपारनंतरही पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे भातशेतीत पाणी साचले असून काही सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून पाणीटंचाईचे संकटही दूर झाले आहे. दरम्यान, लोटे एमआयडीसीचा पाणीपुरवठा आजपासून पूर्ववत झाल्याने बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

किल्ले रायगडावर धुक्याची चादर

किल्ले रायगडावर पावसाची दमदार हजेरी लागली असून दुर्गराज रायगडावर सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळाली. रोपवे परिसरातून पावसात  दिसणारे किल्ले रायगड परिसरातील विहंगम दृश्य मनाला आनंद देऊन गेले. संपूर्ण किल्ले रायगडाला धुक्याचा घेराव पाहायला मिळाला, रोपवेमधून दिसणारा रायरीचा डोंगर आणि त्यामधून वाहणारे झरे असे निसर्गसौंदर्य डोळे दिपवणारे होते.

लातूरमध्ये 13.9 मिमि पाऊस

लातूर जिल्ह्यात रविवारी झालेल्या पावसामुळे अनेक भागांना दिलासा मिळाला आहे. महसूल प्रशासनाच्या नोंदीनुसार, गेल्या चोवीस तासांत  जिल्ह्यात सरासरी 13.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत हलक्या ते मध्यम, तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना काही काळ वाहतुकीचा त्रास सहन करावा लागला. या पावसानंतर अनेक भागांतील शेतकऱ्यांनी खरीप पेरणीच्या कामांना वेग दिला असून शेतात लगबग वाढली आहे. मात्र जिल्ह्यातील काही भागांत अद्यापही पेरणीयोग्य आणि समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने तेथील शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

जालना जिल्ह्यातील अंबड शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या जोरदार पावसाने शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याच पाहायला मिळाले,अनेक ठिकाणी या पावसाने रस्ते जलमय झाले, तर मुख्य रस्त्यांवरील दुकानांमध्ये पाणी शिरल्याच देखील दिसून आलं. मंठा तालुक्यात पावसामुळे ढोकसाळ तांडा येथे पुलावरून पाणी वाहत होते. दरम्यान या पावसाने गावचा रस्ता बंद झाला असून नागरिक या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत.

परभणी शहरातही जोरदार पाऊस 

परभणी शहरातील वसमत रोड, गांधी पार्क, बेलेश्र्वर नगर, आदी भागात महापालिकेकडून नाले सफाई करण्यात आली नाही तर किसान मॉल आणि किसान बेकरी या राष्ट्रीय महामार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या चुकीच्या कामांमुळे या परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने मुख्य रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहताना दिसले. अनेक ठिकाणी रस्त्यांनी नदीचे स्वरूप धारण केले होते. पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली, तर पादचाऱ्यांचीही चांगलीच गैरसोय झाली.

बुलढाण्यातही पावसाची एंट्री

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज बुलढाणा, मोताळा, खामगाव तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली, पेरणीनंतर आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे. बुलढाणा आणि मोताळा तालुक्यात गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं.

जळगावमध्ये पाऊस, पेरण्यांना वेग

जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात आज भिज पाऊस सुरू झाल्याने,शेतकऱ्यांमध्ये समाधानाच वातावरण पसरल्याचं पाहायला मिळत आहे. अल निनोचा प्रभावामुळे यंदा पाऊस कमी राहील असा अंदाज व्यक्त केला जात असताना, जून महिन्याचा शेवटचा दिवस आला तरी, पेरणी योग्य प्रमाणात पाऊस नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, आज सायंकाळच्या सुमारास जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात भिज पावसाने हजेरी लावल्याने, आता पेरण्यांना वेग येणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

भंडाऱ्यात शेतकरी सुखावला, भात पेरणीची सुरुवात

मागील दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं आज पुन्हा एकदा भंडारा जिल्ह्यात बऱ्यापैकी हजेरी लावली. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, साकोली आणि लाखनी तालुक्यातील काही भागांमध्ये कुठं हलक्या तर कुठं मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली. जून महिना संपायला आला असतानाही पावसाअभावी पेरण्या खोडंबलेल्या आहेत. मागील काही दिवसांमध्ये काही प्रमाणात का होईना पावसानं हजेरी लावली आहे. आज आलेल्या पावसानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून उशिरा का होईना आता भंडारा जिल्ह्यातील पेरण्या सुरू होण्याची शेतकऱ्यांची आशा पल्लवित झाल्या आहेत.

हेही वाचा

टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार ; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *