Last Updated:
RTO Motor Vehicle Inspector Transfer Order: यंदा आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या पूर्णपणे संगणकीकृत आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्या.
मुंबई : परिवहन विभागातील बदली प्रक्रियेत पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा नवा आदर्श निर्माण करत १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या शून्य मानवी हस्तक्षेप असलेल्या ऑनलाईन बदली प्रक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली.
तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली २०२२ पासून परिवहन विभागात ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बदली प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप, लाचखोरी किंवा भ्रष्टाचाराला थारा मिळू नये, यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले. यंदा आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या पूर्णपणे संगणकीकृत आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्या.
मोटार वाहन निरीक्षकांची मुख्य कामं कोणती?
मोटार वाहन निरीक्षक हे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अर्थात आरटीमधील अत्यंत महत्त्वाचे पद आहे. रस्त्यावरील सुरक्षितता राखणे, वाहनांची योग्यता तपासणे आणि वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे, हे त्यांचे मुख्य काम असते. वाहने सुरक्षित आहेत की नाहीत, त्यांची उत्सर्जन मानके नियमांनुसार आहेत का आणि सर्व सुरक्षा मानके पाळली जात आहेत का, हे तपासणे मोटार वाहन निरीक्षकांचे काम आहे. सर्व व्यावसायिक वाहनांना वेळेवर ‘फिटनेस प्रमाणपत्र’ देणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य आहे.
भविष्यात परिवहन विभागातील इतर अधिकाऱ्यांच्या बदल्याही याच प्रणालीद्वारे करण्यात येणार असून, त्यामुळे बदली प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना, ५७ ई-वाहनांचे लोकार्पण
परिवहन विभागाने नव्याने खरेदी केलेल्या ५७ पर्यावरणपूरक ई-वाहनांचे लोकार्पण मंत्री सरनाईक यांच्या हस्ते ताडदेव येथील मोटार परिवहन कार्यालयात करण्यात आले. ही ई-वाहने लवकरच राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजासाठी देण्यात येणार असून, पर्यावरणपूरक आणि आधुनिक प्रशासनाच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Mumbai,Maharashtra
