मुंबई : शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) बंडाचा धक्का देत ऑपरेशन टायगर यशस्वी केले. त्यानुसार, ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामध्ये, सर्वाधिक चर्चेत ठरले ते धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर(Omraje). ओमराजे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळी केलेली भाषणंच त्यांच्या चर्चेचं आणि ट्रोलिंगचं कारण ठरलं. अखेर ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडली. मात्र, त्यांच्यासमवेत ठाकरेंचा एकही आमदार शिंदेंच्या शिवसेनेत गेला नसल्याचे उघड झाले. कारण, धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेत शिवसेना उबाठा पक्षाचे दोन आमदार उपस्थित होते, ज्यांनी आपण ठाकरेंसोबतच असल्याचंही सांगितलं. मात्र, बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांची या सभेतील अनुपस्थिती चांगलीच चर्चेत आली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता ऑपरेशन 3 ची चर्चा सुरू आहे. शिंदेंच्या काही आमदारांनी तर 14 आमदार येणार असल्याचा दावाही केलाय. मात्र, सध्यातरी कुठल्याही आमदाराने ठाकरेंशी फारकत घेतल्याचं दिसून येत नाही. धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या सभेत आमदार कैलास पाटील यांनी, मी तुम्हाला सोडून जाणार नाही, असा शब्दच शिवसैनिकांसमक्ष दिला. तर, उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनीही उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांवेळी ओमराजेंसाठी धावपळ केलेल्या या दोन्ही आमदारांनी ठाकरेंसोबत राहणे पसंत केले आहे. मात्र, उद्धव ठाकरेंच्या सभेला धाराशिव मतदारसंघातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांची अनुपस्थितीच चर्चेचा विषय ठरली. सोपल यांच्या अनुपस्थितीचे कारण समोर आलं नसले तरी काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या शिवसेना उबाठा पक्षाच्या बैठकीला ते उपस्थित होते. त्यामुळे, तेही ठाकरेंसोबतच असल्याचं सध्यातरी स्पष्ट आहे. मात्र, ओमराजेंसोबत धाराशिवमधील तीन पैकी एकही आमदार नसल्याचे मात्र उघड झाले.
ओमराजेंसोबत 6 पैकी सध्या एकच आमदार
धाराशिव मतदारसंघात 6 तालुके येतात, त्यापैकी बार्शी, धाराशिव-कळंब आणि उमरगा या तीन मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार असून दोन मतदारसंघात भाजप आणि भूम-परंडा वाशी या एकमेव मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी सावंत हे आमदार आहेत. भाजपकडे तुळजापूरमध्ये राणा जगजितसिंह पाटील आणि औसा येथे अभिमन्यू पवार हे आमदार आहेत. त्यामुळे, सध्या ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नसून महायुतीमधील एकमेव तानाजी सावंत यांचीच त्यांना साथ दिसून येते. कारण, तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जरी पक्षात त्यांचं स्वागत केलं असलं तरी, ओमराजेंनी त्यांच्याशी जुळवून घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने, ते कितपत ओमराजेंच्या पाठिशी राहतील हाही प्रश्नच आहे. औसा मतदारसंघाचे भाजप आमदारही स्वत:चा पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे, ठाकरेंच्या शिवसेनेत असताना जनसंपर्क आणि सर्वसामान्यांशी असलेली नाळ हाच ओमराजेंच्या निवडणुकीचा युएसपी होता, तो गेल्या काही दिवसांत कमी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, आपला तोच युएसपी कायम ठेवणे हे ओमराजेंसमोर मोठं आव्हान आहे. याशिवाय, आगामी निवडणुकीपर्यंत अनेक राजकीय स्थित्यंतरे बदलू शकतात.
कैलास पाटलांना मिळाली स्पेस
धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे ओमराजेंना बंधुसमान आहेत, त्यामुळे तेदेखील ओमराजेंसोबत जातील, जाणार अशी चर्चा मतदारसंघात रंगली होती. मात्र, मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही, हा शब्द कैलास पाटील यांनी जाहीर सभेतून दिलाय, आता ते हा शब्द पाळतात का हे काळच ठरवेल. मात्र, ओमराजेंच्या जाण्याने शिवसेना युबीटी पक्षात त्यांची स्पेस निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे आणि खासदार यांच्याकडून त्यांच्यावरच आता धाराशिवची जबाबदारी देण्यात आल्याचं दिसून येतंय. तर, ठाकरेंशी एकनिष्ठ राहून ते भविष्यातील संधी साधतील का, ओमराजेंशी मैत्री निभावत निर्णय बदलतील हे काळच उत्तर देईल. मात्र, सध्या तरी कैलास पाटील धाराशिवमधील ठाकरेंचे शिलेदार बनले आहेत.
उद्धव ठाकरेंचा ओमराजेंवर तिखट प्रहार
उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन, जाहीर सभांतून जोरदार हल्लाबोल केला. त्यांना खासदार हवेत, मला ओमराजे.. अशी भावनिक साद उद्धव ठाकरेंनी घातली होती, तरीही ओमराजेंनी ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर, धाराशिवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी ओमराजेंचा खरपूस समाचार घेतला. आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? असे म्हणत ओमराजेंच्याच भाषणाचा दाखला धाराशिवमधील सभेत दिला. दरम्यान, आपण उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांवर काहीही बोलणार नाही, ते आपल्यासाठी कामय आदरस्थानी आहेत, मी माझ्या कामातून उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया ओमराजे यांनी धाराशिवमधील सभेपूर्वी दिली होती.
हेही वाचा
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा