Tirupati Honest Cashier : समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक


Tirupati Honest Cashier Returns Gold : आजच्या काळात पैशासाठी नातेसंबंधही विसरण्याच्या घटना समोर येत असताना, तिरुपतीमधून प्रामाणिकपणाचं प्रेरणादायी उदाहरण समोर आलं आहे. एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आलेल्या कुटुंबाची तब्बल 40 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग खोलीतच राहून गेली होती. मात्र, हॉटेलमधील महिला कॅशियर शशी यांनी कोणताही मोह न बाळगता ती बॅग सुरक्षित ठेवली आणि पोलिसांच्या मदतीने मूळ मालकाकडे सुपूर्द केली.

या उल्लेखनीय प्रामाणिकपणाबद्दल तिरुपतीचे पोलीस अधीक्षक (SP) एल. सुब्बारायडू यांनी शशी यांचा शाल देऊन सन्मान केला. त्यांच्या या कृतीचं सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Tirupati Honest Cashier : बंगळुरूत पोहोचल्यावर बॅग हरवल्याचं लक्षात आलं

दागिन्यांचे मालक भरत हे आपल्या कुटुंबासह तिरुपती येथे दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांनी हॉटेलमधून चेक-आऊट करून बंगळुरूकडे प्रस्थान केलं. मात्र, बंगळुरूला पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, सोन्याच्या दागिन्यांची बॅग हॉटेलच्या खोलीतच राहून गेली आहे. ही बाब समजताच कुटुंबीयांची घाबरगुंडी उडाली. त्यानंतर त्यांनी तातडीने तिरुपती पोलिसांशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.

Honest Cashier Returns Gold : महिला कॅशियरने दाखवला प्रामाणिकपणा

दरम्यान, हॉटेलमधील खोलीची तपासणी करताना महिला कॅशियर शशी यांना ही बॅग सापडली. बॅगमध्ये तब्बल 40 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एवढी मोठी संपत्ती समोर असूनही त्यांनी कोणताही मोह न बाळगता ती बॅग सुरक्षित ठेवली.

यानंतर शशी यांनी हॉटेल व्यवस्थापन आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही तातडीने कारवाई करत बॅग मालकापर्यंत सुखरूप पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू केली.

Tirupati Police : पोलिसांच्या उपस्थितीत मालकाकडे बॅग सुपूर्द

तिरुपतीचे पोलीस अधीक्षक एल. सुब्बारायडू यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात शशी यांनी अधिकृतपणे सोन्याची बॅग त्याचे मालक भरत आणि कुटुंबीयांच्या स्वाधीन केली.

हरवलेले दागिने सुरक्षित परत मिळाल्यानंतर भरत यांनी शशी यांचे मनापासून आभार मानले. त्यांनी आमचे दागिने प्रामाणिकपणे जपले. त्यांच्या या उपकारांसाठी आम्ही कायम ऋणी राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Tirupati Honest Employee : एसपींकडून शाल देऊन गौरव

शशी यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत पोलीस अधीक्षक एल. सुब्बारायडू यांनी त्यांना शाल देऊन सन्मानित केलं. आजच्या काळात 40 लाख रुपयांचं सोने समोर असतानाही प्रामाणिक राहणं ही मोठी गोष्ट आहे. अशा कर्मचारी वर्गामुळे समाजात विश्वास टिकून आहे, अशा शब्दांत त्यांनी शशी यांच्या कार्याचा गौरव केला.

या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सर्व स्तरांतून महिला कॅशियर शशी यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं जात आहे.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *