मुंबई : राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत बोलताना कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार असल्याचं म्हटलं. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ 5 जुलैनंतर मिळणार असल्याचं म्हटलं. दत्तात्रय भरणे म्हणाले की कर्जमाफीच्या विषयात अटी; निकष यावर चर्चा झाली. प्राथमिक अंदाजानुसार 56 लाख पेक्षा जास्त शेतक-यांना रक्कम मिळेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्य सरकारचा कर्जमाफीवरुन टाईमपास सुरु असल्याचं म्हटलं.
दत्तात्रय भरणे काय म्हणाले?
दत्तात्रय भरणे म्हणाले की कर्जमाफीच्या विषयात अटी; निकष यावर चर्चा झाली. अटी; निकष यात बदल होणे गरजेचे आहे, या संदर्भात विरोधी पक्षाकडून देखील चांगल्या गोष्टी मांडण्यात आल्या. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक आहेत. सरकारनं ३० जून ला कर्जमाफी दिली जाईल असं म्हटलं होतं. आज आपलं अधिवेशन सुरु आहे, पुरवणी मागण्यांवर चर्चा करतोय, पुरवणी मागण्यांमध्येच शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीत जी रक्कम आहे, त्यावर चर्चा करतोय. योजनेला मंजुरी दिल्यानंतर राज्यपालांच्या सहीसाठी जाईल. राज्यपालांची सही होऊन 5 जुलैनंतर शेतक-यांना कर्जमाफीची रक्कम दिली जाईल, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सगळ्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे. आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत. या राज्यातील अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करणं, कर्जमाफी करणं आमचं कर्तव्य आहे, त्याप्रमाणं राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत, तुम्ही काळजी घेऊ नका असं दत्तात्रय भरणे म्हणाले.आमदारांनी जे चांगले मुद्दे मांडले, त्याची नोंद घेऊन उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.
राजू शेट्टी काय म्हणाले?
कारण नसताना सरकारकडून टाईमपास केला जातोय, पुढची तारीख सांगितली जातेय म्हणजे तारीख पे तारीख असं नाटक सरकारचं सुरु आहे. राज्यपालांकडे जायचं कारण नव्हतं, अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीसाठी पैशांची तरतूद करत आहोत, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं होतं, असं राजू शेट्टी म्हणाले. सरकार फक्त घोषणा करतंय, सरकारकडे पैसा नाहीये, तरतूद केलेल्या पैशांचा वापर दुसरीकडे केला असेल, असा दावा राजू शेट्टी यांनी केला. एकदा सरकारनं प्रामाणिक पणानं कर्जमाफी करणार आहेत की नाही हे सांगावं. निकष, अटी याशिवाय सरकारनं कर्जमाफी करावी. 30 जूनला शेतकऱ्यांची कर्जाची मुदत संपते म्हणजेच या वर्षी सुद्धा शेतकरी थकबाकीदार होतो. 50 हजार रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळालं असतं ते देखील थकबाकीदार होऊ शकतील, असं राजू शेट्टी म्हणाले.
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!