Gokul Election: आप्पा ड्रायव्हिंग सीटवर अन् बाजूला सतेज पाटलांच्या आघाडीतील अरुण नरके; खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘पुढील दोन दिवसांमध्येच आणखी…’


Gokul Election: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी ठरावधारकांकडून ठराव दाखल करून घेण्यासाठी लगभग सुरु आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तीप्रदर्शनाने ठराव दाखल केल्यानंतर आज महायुतीमधील शिंदे गट आणि भाजपकडून ठरावधारकांचा मेळावा घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आघाडीसह विरोधकांकडून सुद्धा ठराव जमा करून घेण्यामध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे. दुसरीकडे, सत्ताधारी आघाडीला मोठा झटका बसला आहे. आमदार सतेज पाटील यांनी स्थापन केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू समविचारी आघाडीमध्ये ज्येष्ठ नेते अरुण नरके यांचा सुद्धा सहभाग होता, त्यांच्या बॅनरवरती सुद्धा ते दिसून आले होते. मात्र, आता तेच अरुण नरके महायुतीच्या गटामध्ये सामील झाल्याने सतेज पाटील यांना निवडणुकीपूर्वी मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे.

ड्रायव्हिंग सीटवर महादेवराव महाडिक 

दुसरीकडे, आज महायुतीमधील भाजपच्या ठरावधारकांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत अरुण नरके दिसून आले. ड्रायव्हिंग सीटवरती महादेवराव महाडिक होते, तर बाजूलाच अरुण नरके सुद्धा होते. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी ते अरुण नरके यांना सोबत घेऊनच हजर झाले. त्यामुळे दोघांच्या एन्ट्रीची मेळाव्यामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.दुसरीकडे आमदार, खासदार धनंजय महाडिक यांनी पुढील दोन-तीन दिवसांमध्ये आणखी तीन एक्के आमच्या बाजूने येतील असा दावा केला. दरम्यान, धनंजय महाडिक यांनी या महायुतीमध्ये भाजप हाच सर्वात मोठा भाऊ असल्याचं म्हटलं आहे. भाजप आणि जनसुराज्य पक्षाने मिळून 2 हजारपेक्षा अधिक ठराव दाखल केला असल्याचं महाडिक यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे विनय कोरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात भाष्य केलं. ते म्हणाले की, बहुतांश ठराव हे महायुतीचे असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र त्याला कितपत यश येईल, हे अद्याप सांगता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाच्या ठरावधारकांचा सुद्धा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांनी वटपौर्णिमेचा उल्लेख करत, जन्मोजन्मी जसं महिला हाच पती मिळावा म्हणून व्रत करतात, त्याच पद्धतीने शिवसेनेसोबत गोकुळमध्ये एकत्र राहण्याचं व्रत आपल्याला करायचं असल्याचं म्हणाले. याचाच उल्लेख करत खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या भाषणामध्ये, “आम्ही जन्मोजन्मी साथ देतो, मात्र नंतर आम्हाला लोहगडाच्या कठड्यावरून ढकलून देऊ नका”, असा टोला लगावला. धैर्यशील माने यांनी लगावलेल्या टोल्याने लोहगड प्रकरणाची आठवण झाल्याने सभागृहामध्ये एकच हाशा पिकला. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *