Last Updated:
आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यामध्ये श्रेयस अय्यर पहिल्यांदाच टीम इंडियाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरला, पण कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यरला पराभवाचा सामना करावा लागला.
मुंबई : आपल्या कॅप्टन्सी करिअरची सुरूवात प्रत्येक खेळाडू विजय मिळवून करण्यासाठी इच्छुक असतो, पण बेलफास्टमध्ये श्रेयस अय्यरसोबत याच्या एकदम उलट झालं. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यामध्ये श्रेयस अय्यर पहिल्यांदाच टीम इंडियाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरला, पण कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यरला पराभवाचा सामना करावा लागला. आयर्लंडने दिलेल्या 183 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा 18.5 ओव्हरमध्ये 148 रनवर ऑलआऊट झाला.
कॅप्टन्सीच्या पहिल्याच प्रयत्नात सगळ्यांना यश मिळत नाही, हे भारताच्या टी-20 क्रिकेटचा इतिहास पाहिला तर लगेच लक्षात येतं. श्रेयस अय्यर हा नकोसा विक्रम करणारा पहिलाच खेळाडू नाही. 2017 साली विराट कोहलीला भारताच्या टी-20 टीमचं पूर्णवेळ कर्णधार बनवण्यात आलं, तेव्हा कानपूरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला.
ऋषभ पंतने पहिल्यांदाच भारताच्या टी-20 टीमचं नेतृत्व केलं तेव्हा टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला. तर शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया पहिल्यांदाच झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेली होती, तेव्हा पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. आता या यादीमध्ये श्रेयस अय्यरचं नाव जोडलं गेलं आहे.
29 महिन्यांचा अजिंक्य प्रवास थांबला
आयर्लंडविरुद्ध झालेला हा पराभव फक्त पराभव नाही तर टीम इंडियाचा दबदबाही संपवणारा आहे. भारताने जानेवारी 2024 पासून लागोपाठ 12 आंतरराष्ट्रीय सीरिज जिंकल्या होत्या. याआधी डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज 1-1 ने बरोबरीत सुटली होती, म्हणजे भारताला ती सीरिज जिंकता आली नव्हती. तेव्हापासून टीम इंडियाने पुढच्या सर्व सीरिज जिंकल्या. आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचे फक्त 2 सामने आहेत, म्हणजेच रविवारच्या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला तरी ही सीरिज 1-1 ने बरोबरीत सुटेल आणि टीम इंडिया सीरिज जिंकू शकणार नाही.
आयर्लंडचा पहिलाच विजय
क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने पहिल्यांदाच टीम इंडियावर विजय मिळवला आहे. याआधी 8 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांमध्ये आयर्लंडला भारताविरुद्ध पराभवच स्वीकारावा लागला होता. आयर्लंड आता 11वी टीम बनली आहे ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा पराभव केला आहे. तसंच आयर्लंडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 8 पूर्ण सदस्य देशांचा पराभव करण्याचा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका या 3 टीमच आता शिल्लक आहेत ज्यांच्याविरुद्ध आयर्लंडला विजय मिळवता आला नाही.
Mumbai,Maharashtra
Jun 26, 2026 11:51 PM IST
Team India : 29 महिन्यात जे कमावलं, ते साडेतीन तासात घालवलं… कॅप्टन होताच श्रेयसने टीम इंडियाचं नाक कापलं!
