मुंबई : भारत हा क्रिकेटवेड्या लोकांचा देश… इथं क्रिकेट म्हणजे धर्म समजला जातो. कपिल देव, सचिन, रोहित, विराट ही नावं देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यात फेमस. इथलं पोरगं मोठं होतय ते हातात बॅट घेऊन… पण अशा या क्रिकेटवेड्या देशात एक फुटबॉल वेडं शहरही आहे… कोल्हापूर. आणि तिथला फुटबॉल (Kolhapur Football) म्हणजे विषय लय हार्ड.
काल परवा कोल्हापूरच्या फुटबॉलची थेट फीफाने (FIFA) दखल घेतली. फिफाने क्रिस्टियानो रोनाल्डोचा फोटो शेयर केला… अन कोल्हापुरी भाषेत कॅप्शन लिहिलं… रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय. यानंतर देशपातळीवर पुन्हा एकदा कोल्हापूरच्या फुटबॉलची चर्चा सुरू झाली.
कोल्हापूर म्हणलं की पहिला डोळ्यासमोर येते ती अंबाबाई… ताराराणी, तांबडा पांढरा रस्सा… जगप्रसिद्ध पायताण, गूळ अन गल्लोगल्लीतील फुटबॉल क्लब. पीटीएम, दिलबहार, खंडोबा, बालगोपाळ, प्रॅक्टिस, शिवाजी मंडळ आणि बरंच काही. पण कोल्हापुरातील हा फुटबॉल काही काल परवाचा नाही. त्याला इतिहास आहे तो शाहू महाराजांच्या काळातील… शंभर सव्वाशे वर्षांचा.
Kolhapur Football History Shahu Maharaj : शाहू महाराजांचा राजाश्रय
कोल्हापूरच्या फुटबॉलचा पाया 1890 च्या दशकात राजर्षी शाहू महाराजांच्या काळात रचला गेला. स्थानिक खेळाडू ब्रिटीश अधिकाऱ्यांसोबत सामने खेळत आणि शाहू महाराज स्वतः या सामन्यांना उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देत असत. 1920 च्या दशकात स्थापन झालेला ‘जामदार फुटबॉल क्लब’ हा भारतातील सर्वात जुन्या क्लबपैकी एक आहे. त्याची स्थापना पहिल्या फिफा विश्वचषकापूर्वी (1930) झाली होती. 1936 साली कोल्हापूर विरुद्ध इंग्लंड असा एक सामना कोल्हापुरात खेळवण्यात आला. त्यावेळी कोल्हापूरने साहेबांच्या बलाढ्य संघाला 1-1 असं बरोबरीत रोखलं आणि त्याची चर्चा जगभरात झाली.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान कोल्हापूर जवळील वळीवडेच्या छावण्यांमध्ये पोलंडचे निर्वासित वास्तव्यास होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापूरचा फुटबॉल पाहिला. त्यातील काही पोलिश खेळाडूंनी स्थानिक खेळाडूंना फुटबॉलमधील तांत्रिक कौशल्यं आणि रणनीतीचे धडे दिले. त्यामुळे कोल्हापूरच्या फुटबॉलला अधिक बहर आला.
Kolhapur Sports Association : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना
शाहू महाराजांप्रमाणे त्यांचे पुत्र राजाराम महाराजही फुटबॉल वेडे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1940 मध्ये Kolhapur Sports Association (KSA) ची स्थापना झाली. आज त्या अंतर्गत वरिष्ठ गटात 16 क्लब आहेत. त्यांच्यामध्ये केएसएस लिग आणि इतर स्पर्धा होतात. कोल्हापुरात फुटबॉलचे मैदान हे वर्षभर भरलेलं असतं. साधारणपणे डिसेंबर ते मे हा फुटबॉलचा हंगाम. त्यावेळी फुटबॉलच्या मैदानात इथे तालमींच्या समर्थकांमध्ये राडे होतात, पुन्हा ते मिटतातही.
सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू झालेला कोल्हापुरातील फुटबॉल आजही तेवढ्याच ताकतीने, तेवढ्याच जोमात सुरू आहे. आजही फुटबॉलचा सामना सुरू झाला की दोन्ही संघांच्या समर्थकांनी छत्रपती शाहू मैदान तुडुंब भरतंय.
वर्ल्डकप आला की कोल्हापूर कसं रंगून जातं, इथल्या कोपऱ्या-कोपऱ्यावर मेस्सी अन् रोनाल्डोचे मोठमोठे कटआऊट्स लागतात, गल्ल्या तर विविध देशांच्या झेंड्यांनी सजून जातात. इथल्या प्रत्येक घरात, प्रत्येक श्वासात आजही फुटबॉल आहे अन् पिढ्यानपिढ्या तो पुढे जातोय. म्हणूनच फिफालाही त्याची भुरळ पडलीय… आणि ते पण म्हणतात… कोल्हापूरचा विषय लय हार्ड आहे.
ही बातमी वाचा:
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला