Nashik Vidhan Parishad Election Result 2026: ‘माझे वडील 8 वर्षांपासून पॅरेलाईज, निवडणुकीत माझा बाप काढला म्हणून मी ‘बाप’ दाखवून दिला’; आईने औक्षण करताच गोकुळ गीतेंचा दराडेंवर घणाघात


Nashik Vidhan Parishad Election Result 2026: नाशिक विधान परिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचा दारूण पराभव करत अपक्ष आणि भाजपचे बंडखोर गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी पहिल्याच फेरीत ऐतिहासिक विजय संपादित केला आहे. या विजयानंतर ते आपल्या निफाड तालुक्यातील शिंगवे येथील मूळ गावी पोहोचले. तिथे त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी आमदार गोकुळ गीते प्रचंड आक्रमक पाहायला मिळाले. निवडणुकीदरम्यान झालेल्या वैयक्तिक पातळीवरील टीकेचा आणि कौटुंबिक अपमानाचा त्यांनी जाहीर समाचार घेतला.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी फोनवरून गोकुळ गीते यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप गोकुळ गीते यांनी केला होता. कुणाल दराडे यांनी आमचा बाप काढल्यामुळे नाराज आहोत. अशा प्रकारे धमकी दिल्याने मी आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असे गोकुळ गीते म्हणाले होते. आता विजयानंतर गोकुळ गीते यांनी “निवडणुकीत माझा बाप काढण्यात आला होता, माझे वडील 7, 8 वर्षांपासून पॅरेलाईज (Paralyzed) आहेत. त्यामुळे मी माझा बाप दाखवून दिला,” असे म्हणत दराडेंवर निशाणा साधलाय.  

Gokul Gite: मतदारांनी दराडेंना नाकारलं

दरम्यान, आपल्या विजयाचे गुपित सांगताना गोकुळ गीते यांनी महायुतीकडून झालेल्या दबावतंत्राचाही उल्लेख केला. “मी निवडणुकीतून माघार कधीच घेतली नव्हती. मात्र महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीनंतर मी केवळ जाहीर प्रचार थांबवला होता. परंतु, मी घरात बसलेलो असताना माझ्या पाठीशी माझे कार्यकर्ते आणि मित्र खंबीरपणे उभे राहिले, त्यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने यंत्रणा राबवली. शेवटच्या दिवसापर्यंत माझ्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात आला होता. लोकांची स्वतःची वैचारिक मते असतात; नरेंद्र दराडे यांनी मतदारांचा विश्वास गमावला होता, म्हणूनच आज गोकुळ गीते आमदार झाला आहे. हा माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि मित्रांचा विजय आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Gokul Gite: विमानात बसलो, तरी माझे पाय जमिनीवरच राहतील

विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गोकुळ गीते यांना मुंबईला बोलावले असून, त्यांच्यासाठी नाशिकमध्ये विशेष विमान पाठवले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ते लवकरच शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता, गीते यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केले. “मी जरी विमानात बसलो, तरी माझे पाय नेहमी जमिनीवरच राहतील,” असे त्यांनी म्हटले. 

दुसरीकडे, मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी या निकालाला महायुतीसाठी मोठा धक्का मानले असून, महायुतीची तब्बल पावणेपाचशे मते असताना दराडे यांना केवळ 248 मते का पडली? याची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पूर्ण चौकशी केली जाईल, असे संकेत दिले आहेत. तर पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे हे पराभव स्वीकारून मतमोजणी केंद्रावरून निघून गेल्याचे पाहायला मिळाले होते.

आणखी वाचा

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: ‘शिवसेनेचा उमेदवारच चुकीचा होता, कोणाचा बाप काढणं ही दराडेंची संस्कृती’; भावाचा विजय होताच गणेश गीते भरभरून बोलले; म्हणाले…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *