Last Updated:
Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पुन्हा एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. अण्णा हजारे यांनी राज्य सरकारविरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे.
अहिल्यानगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पुन्हा एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. अण्णा हजारे यांनी राज्य सरकारविरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे. राळेगणसिद्धी येथे येत्या ५ जुलै पासून अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने माहितीच्या अधिकाराबाबत (RTI) १२ जून २०२६ रोजी लागू केलेल्या नव्या नियमांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे.
माहिती अधिकार अतंर्गत माहिती मागवताना आता राज्य सरकारने नवे निकष लागू केले आहेत. या निकषांविरोधात माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या नव्या नियमांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे नवे नियम माहितीचा अधिकार कमकुवत करणारे आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे असल्याचा थेट आरोप अण्णांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवून हे जाचक नियम तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. सरकारने पाऊल मागे न घेतल्यास, येत्या ५ जुलै २०२६ पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नव्या नियमावलीतील तरतुदींवर अण्णा हजारे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. माहिती मागवण्यासाठी करण्यात आलेली भरमसाठ शुल्कवाढ, अर्जदाराला ओळखपत्राची केलेली सक्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे “एक विषय–एक अर्ज” ही नवी अट, यांमुळे सर्वसामान्यांना माहिती मिळवणे अत्यंत कठीण होणार आहे. ही एकप्रकारे माहिती अधिकार कायद्याची गळचेपी असून, पारदर्शकता संपवण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा अण्णांनी पत्रात केला आहे.
आता अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर राज्य सरकार तातडीने पावले उचलणार की अण्णा हजारे हे पुन्हा एकदा वयाच्या नव्वदीत आंदोलनात उतरणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Ahmadnagar,Maharashtra
Anna Hazare : अण्णा हजारे पुन्हा मैदानात! वयाच्या नव्वदीत सरकारविरोधात आंदोलन; ५ जुलैची डेडलाईन कोणत्या कारणांसाठी?
