Last Updated:
शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या आजी माजी नगरसेवकांनी पैशांचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींना वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलल्याचा आरोप आहे.
नवी मुंबईच्या उलवे परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं पैशांचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींना वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकललं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यात सत्ताधारी पक्षांशी संबंधित असलेल्या राजकीय नेत्यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. पोलिसांनी या गंभीर प्रकरणी पेणमधील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या माजी नगरसेवकांसह एकूण चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
१७ जून रोजी पडला छापा
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १७ जून रोजी रेल्वे पोलिसांना उलवे परिसरातील एका लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित लॉजवर अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी १४ आणि १७ वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींची या वेश्याव्यवसायातून सुटका केली. प्राथमिक तपासात या निष्पाप मुलींना पैशांचे आमिष दाखवून आणि फसवून या काळ्या धंद्यात ओढल्याचं स्पष्ट झालं.
उलवे पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला असता यात काही बड्या राजकीय पुढाऱ्यांची नावं समोर आली. तपासादरम्यान पेण येथील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाचे स्वीकृत नगरसेवक उपेंद्र कोलाडकर आणि भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक कुणाल नाईक यांचा या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचं उघड झाले. पोलिसांनी या दोघांसह इतर दोन साथीदारांना अटक केली आहे.
कठोर कलमांखाली गुन्हे दाखल
पोलिसांनी अटक केलेल्या चारही आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा आणि ‘भारतीय न्याय संहिते’च्या (BNS) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेत त्यांना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या मोठ्या कारवाईमुळे पेणसह संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस आता कसून शोध घेत आहेत.
Navi Mumbai Panvel Raigarh,Raigad,Maharashtra
Mumbai: 2 सख्ख्या अल्पवयीन बहिणींना वेश्याव्यवसायात ढकललं, शिंदे गटासह भाजपच्या आजी-माजी नगरसेवकांना अटक
