Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने असा पराक्रम करून दाखवला जो रोहित अन् कोहली सुद्धा करू शकले नाहीत! एकाचवेळी दोन भीम पराक्रम नावावर जमा


Harmanpreet Kaur: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने तिच्या क्रिकेट कारकिर्दीत एक मोठा टप्पा गाठला आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरताना, तिने एक असा विक्रम रचला जो आजपर्यंत कोणत्याही पुरुष किंवा महिला क्रिकेटपटूने केला नव्हता. हरमनप्रीत 200 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली खेळाडू ठरली आहे. महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान मिळवलेली ही कामगिरी तिच्या 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बरेच काही सांगून जाते. 2009 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या पहिल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करणारी हरमनप्रीत कौर, भारतीय संघाचे नेतृत्व करत सातत्याने नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. पुरुषांच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 163 सामने खेळण्याचा विक्रम आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगच्या नावावर आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा 159 सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत विराट कोहली (125 सामने) खूप मागे आहे. दरम्यान, महिला क्रिकेटमध्ये हरमनप्रीत कौरने आता 200 सामन्यांसह अव्वल स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडची सुझी बेट्स 184 सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. डॅनी वायट-हॉज (183 सामने) तिसऱ्या, तर एलिस पेरी (177 सामने) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

2009 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण 

हरमनप्रीत कौरने 2009 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने भारतीय महिला क्रिकेटच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक मोठी यश मिळवली आणि महिला क्रिकेटला एक नवी ओळख मिळाली. हे देखील उल्लेखनीय आहे की, 2009 मध्ये तिच्यासोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंपैकी केवळ सहा खेळाडू सध्या सक्रिय आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी यांनीही हरमनप्रीतचे कौतुक केले होते. तो म्हणाला की, हरमनप्रीत केवळ एक महान खेळाडूच नाही, तर जगभरातील क्रिकेटपटूंसाठी एक प्रेरणास्थान आहे. साळवी यांच्या मते, हरमनप्रीत आपल्या कठोर परिश्रमाने, शिस्तीने आणि अनुभवाने तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या कारकिर्दीत पुढे जाण्यास मदत होते. दक्षिण आफ्रिकेची स्टार अष्टपैलू खेळाडू क्लोई ट्रायॉननेही भारतीय कर्णधाराच्या या कामगिरीला ऐतिहासिक म्हटले आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) हरमनप्रीतसोबत खेळलेल्या ट्रायॉनने सांगितले की, 200 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणे ही एक अविश्वसनीय कामगिरी आहे आणि ती जगभरातील खेळाडूंसाठी एक आदर्श राहिली आहे.

दुसरीकडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. संघाने आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत केले. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानला हरवून पुनरागमन केले. तथापि, अलीकडील सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचेच वर्चस्व राहिले असून, त्यांनी भारताविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 ने जिंकली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *