Last Updated:
एकदा रात्रीच्या वेळी झोपताना फक्त ‘चादर घेण्याच्या’ किरकोळ कारणावरून या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यातूनच ही हत्या झाली,
पुणे : पुणे येथील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात 12 वर्षांपूर्वी घडलेल्या एका थरारक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या खून प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारलाच दणका दिला आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका मनोरुग्णाने दुसऱ्या रुग्णाचा अमानुष छळ करून गळा आवळून खून केला होता. या प्रकरणात अनेक वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर हायकोर्टाने मृत रुग्णाच्या पत्नीला २२ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.
ही अत्यंत धक्कादायक घटना २०१३ मध्ये घडली होती. मानसिक आजार जडल्यामुळे शमशुद्दीन भानवाडिया (वय ५०) यांना उपचारासाठी येरवडा मनोरुग्णालयाच्या निरीक्षण वॉर्डात ठेवण्यात आले होते. याच वॉर्डात पैलवान असलेला दीपक सुरवसे हा मनोरुग्णही दाखल होता. एकदा रात्रीच्या वेळी झोपताना फक्त ‘चादर घेण्याच्या’ किरकोळ कारणावरून या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या वादाचे रूपांतर इतक्या भीषण मारहाणीत झाले की, आरोपी दीपक सुरवसे याने भान हरपून शमशुद्दीन भानवाडिया यांना अमानुष मारहाण केली आणि शेवटी त्यांचा गळा आवळून निर्घृण खून केला.
या भयंकर घटनेनंतर मृत शमशुद्दीन यांच्या पत्नी नूरजहाँ भानवाडिया यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नुकसान भरपाईची मागणी केली होती. तब्बल ८ वर्षे हा न्यायालयीन लढा सुरू होता. अखेर उच्च न्यायालयाने नूरजहाँ यांची विनंती मान्य केली. ८ वर्षे झालेल्या मानसिक त्रासाची आणि कोर्ट कचेरीच्या खर्चाची भरपाई म्हणून ५ लाख रुपये आणि मुख्य नुकसान भरपाई म्हणून १७ लाख रुपये, असा एकूण २२ लाख रुपयांचा मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने ८ जून रोजी राज्य सरकारला जारी केले आहेत. आरोग्य विभागाला याची अंमलबजावणी करण्याचे आदेश मिळाले आहेत.
मनोरुग्ण आरोपी दीपक सुरवसे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे पोलिसांनी त्याला जेलमध्ये न ठेवता मनोरुग्णालयातीलच ‘स्वतंत्र उंच वॉर्डात’ ठेवले आहे. गेल्या ८ ते १२ वर्षांपासून त्याच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. तो पूर्णपणे बरा होत नाही, तोपर्यंत त्याला अधिकृत शिक्षा सुनावता येणार नाही, अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.
Pune,Maharashtra
Jun 21, 2026 10:37 AM IST
पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात एका चादरीसाठी झाला होता खून; 12 वर्षांनंतर पत्नीला मिळणार मोठी भरपाई, हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश
