Pune Rain Alert: मुंबईत पावसाची एन्ट्री; आता नंबर पुण्याचा, पुणेकरांना कधी घेता येणार मान्सूनच्या सरींचा आनंद? हवामान विभागने दिवसच सांगितला | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी पुण्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत. मात्र, आता पुणेकरांची ही प्रतीक्षा संपणार असून हवामान विभागाने पुण्यासाठी आनंदाची बातमी दिली आहे.

पुणे पाऊस अपडेट
पुणे पाऊस अपडेट

पुणे: संपूर्ण महाराष्ट्राला ज्या मान्सूनची आतुरतेने प्रतीक्षा होती, त्याचे अखेर रविवारी मुंबईत ढगांच्या गडगडाटासह जोरदार आगमन झाले आहे. मुंबईत पाऊस बरसल्यामुळे आता पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या पुणेकरांच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी पुण्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत. मात्र, आता पुणेकरांची ही प्रतीक्षा संपणार असून हवामान विभागाने पुण्यासाठी आनंदाची बातमी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्यामुळे पुणेकरांना असह्य उकाड्याचा आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागत आहे. शनिवारी पुण्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा चक्क ६.३ अंशांनी वाढून ३६.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यामुळे दुपारच्या वेळी पुणेकरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या. मात्र, आता या तीव्र उन्हातून पुणेकरांची लवकरच सुटका होणार आहे.

पुणेकरांनो, छत्र्या-रेनकोट रेडी ठेवा

हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत पुण्याच्या तापमानात मोठी घट होण्यास सुरुवात होईल. हवामान विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनीही सोशल मीडियावर माहिती देताना सोमवारपासून मुंबईसह पुण्यात चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या हवामान मॉडेल्सनुसार, मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी सध्या वातावरणात अत्यंत पोषक बदल होत आहेत.

२३ ते २५ जून या कालावधीत पुणे शहर आणि परिसरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी बरसतील.

पुणे-ठाण्याला ‘यलो अलर्ट’

रविवारी सकाळपासूनच दक्षिण मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये पावसाने संततधार सुरू केली आहे. हवामान खात्याने २० जूननंतर राज्यात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज दिला होता. त्यानुसारच मुंबईत पाऊस दाखल झाला असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्राने सोमवारपासून मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरासाठी मेघगर्जनेसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. २३ जूनपासून संथावलेला मान्सून पुन्हा गती घेणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळणार आहे.

मराठी बातम्या/पुणे/

Pune Rain Alert: मुंबईत पावसाची एन्ट्री; आता नंबर पुण्याचा, पुणेकरांना कधी घेता येणार मान्सूनच्या सरींचा आनंद? हवामान विभागने दिवसच सांगितला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *