Omraje Nimbalkar : मध्यरात्री खलबतं! कैलास पाटलांनी दिला मातोश्रीचा निरोप, तर वरुण सरदेसाई म्हणतात, ”ज्या विषयावर चर्चा झाली ती…” | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Omraje Nimbalkar : दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हे फुटीर खासदार आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले जात असतानाच, दुसरीकडे पुण्यात मध्यरात्री अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.

मध्यरात्री खलबतं! कैलास पाटलांनी दिला मातोश्रीचा निरोप, तर वरुण सरदेसाई म्हणतात, ''ज्या विषयावर चर्चा झाली ती...''
मध्यरात्री खलबतं! कैलास पाटलांनी दिला मातोश्रीचा निरोप, तर वरुण सरदेसाई म्हणतात, ”ज्या विषयावर चर्चा झाली ती…”

अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षात (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळ तापले आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हे फुटीर खासदार आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले जात असतानाच, दुसरीकडे पुण्यात मध्यरात्री अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.

ओमराजे निंबाळकर यांच्या मनधरणीसाठी ठाकरे गटाचे दोन शिलेदार पक्ष सचिव वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील मध्यरात्री १ वाजता अचानक त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी दाखल झाले. उद्धव ठाकरे यांचा अत्यंत महत्त्वाचा निरोप घेऊन हे दोन्ही नेते ओमराजेंच्या घरी पोहोचल्याने या हाय व्होल्टेज भेटीबाबत सस्पेन्स वाढला आहे.

“काही गोष्टी माध्यमांसमोर बोलणे योग्य नाही” – वरुण सरदेसाई

भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वरुण सरदेसाई यांनी थेट भाष्य करणे टाळले. सरदेसाई म्हणाले, “ओम दादा यांच्याबाबत जो काही निर्णय लागला, तो अनपेक्षित होता. या निकालानंतर त्यांच्या संपूर्ण परिवाराला मोठा धक्का बसला आहे, त्यावरच आम्ही चर्चा केली. ते आजही शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार आहेत. त्यांनी पहिली निवडणूक लढवून आमदारकी जिंकली आणि त्यानंतर तीनवेळा खासदार झाले. आम्ही पक्ष सचिव म्हणून त्यांची भेट घेतली आणि काही अंतर्गत विषयांवर चर्चा केली. मात्र, ज्या ज्या गोष्टींवर चर्चा झाली, त्या सगळ्याच माध्यमांसमोर जाहीर करणे योग्य नाही. जर सर्व उघड करायचे असते, तर आम्ही अशी मध्यरात्री भेटलो नसतो, असेही त्यांनी म्हटले.

कैलास पाटलांनी हिंट दिली, “उद्धव साहेबांचा निरोप दिला, त्यांनी..”

मदार कैलास पाटील यांनी थेट मनधरणी सुरू असल्याचा कबुलीवजा दावा केला. पाटील म्हणाले, “गेल्या २० वर्षांपासून ओमराजेंनी ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला, त्यांना न्याय मिळाला नाही, ही भावना आहे. पण आम्ही आमचे प्रयत्न सोडलेले नाहीत, आमचे मनधरणीचे प्रयत्न आजही सुरू आहेत. आम्ही स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा निरोप घेऊन त्यांच्याकडे आलो होतो.”

कैलास पाटील यांनी म्हटले की, “उद्धव साहेबांच्या प्रति ओमराजेंच्या मनात जी आदराची भावना आहे, ती आजही कायम आहे. त्यामुळे ते पक्षातच राहतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. साहेबांचा निरोप ऐकल्यानंतर ओम दादांनी ‘मला उद्याचा एक दिवस द्या, त्यानंतर मी माझा निर्णय ठरवतो’ असे सांगितले आहे. त्यामुळे आता पुढचे २४ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत.”

दिल्लीतील संभाव्य पक्षप्रवेशापूर्वी ठाकरेंच्या शिलेदारांनी पुण्यात टाकलेल्या या ‘फिल्डिंग’मुळे ओमराजे निंबाळकर आपली बंडखोरी रोखणार की शिंदेंच्या शिवसेनेत धनुष्यबाण हाती धरणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

Omraje Nimbalkar : मध्यरात्री खलबतं! कैलास पाटलांनी दिला मातोश्रीचा निरोप, तर वरुण सरदेसाई म्हणतात, ”ज्या विषयावर चर्चा झाली ती…”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *