कोकण ट्रीप ठरली अखेरची, संभाजीनगरमधील 5 तरुणांचा गणपतीपुळेच्या समुद्रात अंत | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले ५ तरुण बुडाले आहेत. या घटनेनं राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

News18
News18

शनिवारचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी ठरला. राज्याच्या दोन वेगवेगळ्या भागांमध्ये घडलेल्या दोन मोठ्या आणि भयंकर दुर्घटनांमध्ये तब्बल १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. परभणी जिल्ह्यात एका मंदिराचे छत कोसळून ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आणि १६ जण गंभीर जखमी झाले. तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले ५ तरुण बुडाले आहेत. या घटनेनं राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गणपतीपुळे येथील दुर्दैवी घटना

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथून १९ तरुणांचा एक गट कोकणात गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास यातील काही तरुण समुद्रात पाण्याचा आनंद घेण्यासाठी उतरले. मात्र, समुद्राच्या पाण्याचा आणि लाटांचा योग्य अंदाज न आल्याने पाच जण अचानक समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले.

आपले मित्र बुडत असल्याचे लक्षात येताच किनाऱ्यावरील आणि सोबतच्या अन्य तरुणांनी मदतीसाठी एकच आरडाओरडा सुरू केला. यानंतर जीवरक्षकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, परंतु लाटांचा जोर जास्त असल्याने मदतकार्यात अडथळे आले. या बुडालेल्या पाच तरुणांपैकी प्रेम दीपक आदमाने (वय १९) या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आले असून, उर्वरित बेपत्ता असलेल्या चौघांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

आदित्य संतोष राऊत (वय २२), अनिकेत बंडू हिवराळे (वय २०), आनंद राजू नरवडे (वय २०), प्रेम दीपक आदमाने (वय १९) आणि यश रामेश्वर कांबळे (वय १९) असं समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या तरुणांची नावं आहेत. प्रेम आदमानेचा मृतदेह सापडला असून इतर मृतदेह शोधले जात आहेत. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होतं.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी यांनी तातडीने गणपतीपुळे येथे धाव घेतली. सध्या तटरक्षक दलाच्या मदतीने बेपत्ता तरुणांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. सर्व तरुण बिडकीन येथील असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *