Last Updated:
हर्ष आणि त्याला मारणारे तिन्ही आरोपी हे एकमेकांचे खूप जवळचे मित्र होते. मात्र, गेल्या ६ महिन्यांपासून त्यांच्यामध्ये एकाच तरुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांवरून सातत्याने मोठे वाद सुरू होते
पुणे : पुणे शहरात ‘कॉमन गर्लफ्रेंड’ म्हणजेच एकाच तरुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांच्या वादातून मित्रांनीच मित्राचा गेम केल्याची एक थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. गोखलेनगर परिसरात २३ वर्षांच्या एका तरुणाला त्याच्याच जीवलग मित्रांनी बेसबॉल स्टिकने अमानुष मारहाण करून त्याचा निर्घृण खून केला. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्र फिरवत तिन्ही आरोपी मित्रांना नवी मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे पुणे शहर आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष मच्छिंद्र जाधव (वय २३) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. हर्ष आणि त्याला मारणारे तिन्ही आरोपी हे एकमेकांचे खूप जवळचे मित्र होते. मात्र, गेल्या ६ महिन्यांपासून त्यांच्यामध्ये एकाच तरुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांवरून सातत्याने मोठे वाद सुरू होते. एकाच मुलीच्या प्रेमात पडल्यामुळे मित्रांमधील मैत्रीचे रूपांतर भयंकर शत्रुत्वात झाले होते.
दोन दिवसांपूर्वी मृत हर्ष जाधव हा अतिप्रमाणात दारू पिऊन मध्यधुंद अवस्थेत आरोपींपैकी एका मित्राच्या घरात घुसला होता. तिथे त्याने मुलीच्या वादावरून प्रचंड गोंधळ घातला आणि शिवीगाळ केली. आपल्याच घरात येऊन हर्षने केलेला हा अपमान मित्रांच्या जिव्हारी लागला. याचाच वचपा काढण्यासाठी आणि सूड घेण्यासाठी तिघांनी मिळून हर्षचा गेम करण्याचा म्हणजेच त्याला संपवण्याचा पक्का कट रचला.
कटानुसार, आरोपींनी हर्षला गाठले आणि त्याच्यावर बेसबॉल स्टिकने सपासप भीषण प्रहार केले. डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने हर्ष रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
हर्षचा मृत्यू झाल्याचे समजताच तिन्ही आरोपींनी पुण्यातून पळ काढला. मात्र, चतुःशृंगी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांचा माग काढत अभिषेक पवार, प्रथमेश धोत्रे आणि माऊली देवकर या तिन्ही नराधम मित्रांना नवी मुंबईतून ताब्यात घेतले आहे. किरकोळ प्रेमप्रकरणातून मित्रांनीच मित्राचा अमानुष बळी घेतल्याने तरुणाईच्या वाढत्या गुन्हेगारी मानसिकतेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Pune,Maharashtra
ते जिवलग मित्र, पण ‘गर्लफ्रेंड कॉमन’; रात्री हर्षला त्या अवस्थेत पाहिलं अन् मित्रानंच कायमचं संपवलं, पुण्यात थरार
