Last Updated:
आत्महत्या करण्याच्या दोन दिवसांपूर्वी विशाखा घराबाहेर एका महिला शेजाऱ्याशी बोलत उभी होती. हे कृत्य पतीने सीसीटीव्हीमध्ये पाहिले आणि घरात आल्यावर तिला अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आली
ठाणे : लग्न होऊन केवळ ४८ दिवस झाले होते… डोळ्यात सुखी संसाराची स्वप्ने घेऊन विशाखा सासरी आली होती. मात्र, हुंड्याची हाव असलेल्या सासरच्यांनी आणि संशयांध डॉक्टर पतीने तिच्यावर अशा काही अमानुष छळाच्या मर्यादा ओलांडल्या, ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती. अखेर या छळाला कंटाळून तिने गळफास लावून आपले आयुष्य संपवले. विशाखा तिळकर असे या दुर्दैवी नवविवाहितेचे नाव आहे. या प्रकरणात अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी मुख्य आरोपी डॉक्टर पती नितीन टिळकर याला बेड्या ठोकल्या असून, त्याच्या आई आणि भावाचा शोध सुरू आहे.
विशाखाचे कुटुंबीय आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती डॉ. नितीन तिळकर याने अंबरनाथ येथील आपल्या घराच्या आत आणि बाहेर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. विशाखा घरात काय करते, कुठे बसते, कोणाशी बोलते, या तिच्या प्रत्येक हालचालीवर हा डॉक्टर पती हॉस्पिटलमध्ये बसून २४ तास डिजिटल नजर ठेवायचा. तिची वैयक्तिक प्रायव्हसी पूर्णपणे हिरावून घेण्यात आली होती.
विशाखा आणि डॉ. नितीन यांचे लग्न याच वर्षी ३० एप्रिल रोजी झाले होते. लग्नापूर्वी सर्व काही आलबेल होते, परंतु लग्न लागताच सासरच्यांचे खरे रूप समोर आले. लग्नात आपल्या अपेक्षेप्रमाणे अफाट पैसे, दागिने आणि “मान-सन्मान” मिळाला नाही, या कारणावरून सासरच्यांनी पहिल्या दिवसापासूनच टोमणे मारणे सुरू केले. “माहेरून आणखी दागिने आणि रोकड घेऊन ये,” यासाठी विशाखावर सतत मानसिक दबाव टाकला जात होता.
डॉक्टर पतीच्या या छळाची क्रूरता इथेच थांबली नाही. विशाखाने चुकून जरी कोणाशी संवाद साधला, तरी ती घरी आल्यावर तिला गुरांसारखे बेदम मारले जायचे. आत्महत्या करण्याच्या दोन दिवसांपूर्वी विशाखा घराबाहेर एका महिला शेजाऱ्याशी बोलत उभी होती. हे कृत्य पतीने सीसीटीव्हीमध्ये पाहिले आणि घरात आल्यावर तिला अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आली. सततचा शारीरिक छळ, मानसिक छळ आणि सीसीटीव्हीच्या कैदेमुळे ती पूर्णपणे हताश झाली होती.
आत्महत्या करण्यापूर्वी विशाखाने आपल्या आईला फोन करून सासरी होत असलेल्या या अमानुष छळाची कल्पना दिली होती. मुलीची गंभीर परिस्थिती ऐकून तिचे आई-वडील तिला सासरच्या नरकातून सोडवून परत माहेरी आणण्याच्या तयारीतच होते. मात्र, ते निघण्यापूर्वीच विशाखाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची काळीज पिळवटून टाकणारी बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली.
या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पती डॉ. नितीन तिळकर, सासू छाया आणि दीर निनाद यांच्याविरुद्ध हुंडाबळी, शारीरिक-मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नराधम पतीला अटक केली असून, फरार सासू आणि दिराचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
Thane,Maharashtra
ठाणे : घराच्या प्रत्येक कोपऱ्यात CCTV; 24 तास नजर अन्…लग्नाच्या 48 दिवसातच डॉक्टर नवऱ्यानं नरक बनवलं आयुष्य, विशाखानं स्वतःलाच संपवलं
