3 मैत्रिणींसोबत रील बनवत होता तरुण, अचानक मृत्यूच्या सापळ्यात अडकला, तिघी वाचल्या पण अंशचा करुण अंत | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

तीन मैत्रिणींसोबत रील बनवत असताना एका तरुणावर काळाने झडप मारली आहे. मित्रांच्या डोळ्यादेखत त्याचा करुण अंत झाला आहे.

News18
News18

सोशल मीडियावर रील्स बनवण्याच्या नादातून एक अत्यंत थरारक प्रकार वाशिम जिल्ह्यातून समोर आला आहे. मानोरा तालुक्यातील फुलउमरी परिसरात असलेल्या बोरमळी पाणी प्रकल्पात रिल बनवण्याच्या नादात एका १७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

अंश जयस्वाल (वय १७ वर्ष, रा. पुसद, जि. यवतमाळ) असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे पुसद आणि मानोरा परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून जयस्वाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

५ मित्र-मैत्रिणी रिल बनवण्यासाठी प्रकल्पावर गेले

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातील दोन तरुण आणि त्यांच्या तीन मैत्रिणी मिळून मानोरा तालुक्यातील फुलउमरी जवळील बोरमळी पाणी प्रकल्पावर फिरण्यासाठी आले होते. यावेळी ते पाण्यात उतरून रिल बनवत होते. पाण्याच्या खोलीचा कोणताही अंदाज नसताना आणि तसेच त्यांना पोहता येत नसतानाही हे तरुण-तरुणी पाण्यात उतरले.

…आणि कॅमेऱ्यासमोरच घात झाला!

अंश जयस्वाल आणि त्याच्या तीन मैत्रिणी पाण्यात पुढे पुढे जात होते, तर त्याचा दुसरा एक मित्र मोबाईलमध्ये त्यांची रिल शूट करत होता. रिलच्या नादात हे चौघेही खोल पाण्याच्या दिशेनं गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने अचानक चौघेही बुडू लागले.

या गडबडीत तिन्ही मैत्रिणींनी पाण्याच्या बाहेर पडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. धक्कादायक बाब म्हणजे, यातील एक तरुणी अंशसोबत खोल पाण्यात बुडतच होती, मात्र दुसऱ्या मैत्रिणीने प्रसंगावधान राखून तिचे केस पकडले आणि तिला खेचून बाहेर काढले. यामुळे या तिन्ही तरुणींचे प्राण वाचले, मात्र अंश जयस्वालला खोल पाण्यातून बाहेर पडता आले नाही आणि तो डोळ्यादेखत पाण्यात गडप झाला.

आपत्कालीन बचाव पथकाला पाचारण

अंश पाण्यात बुडाल्याचं पाहताच सोबतच्या मित्र-मैत्रिणींनी एकच टाहो फोडला. त्यांनी आरडाओरडा केला. आक्रोश ऐकून घटनास्थळी आलेले काही स्थानिक तरुण तत्काळ पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज येत नसल्याने अंशचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर स्थानिक प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून पिंजर येथील ‘संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाला’ पाचारण केले असून, सध्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अवघ्या १७ वर्षाच्या अंशचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *