सध्या संपूर्ण देशात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची चर्चा सुरु आहे. या आंदोलनात अनेक राजकीय लोक, कलाकार देखील सहभागी झाले. काल रात्री हे आंदोलन चिघळले आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. दगडफेक झाली. 118 पोलीस तर 150 आंदोलक जखमी झाले. यावर राज्याचे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चेहरा नसलेल्या लोकांकडून पोळी भाजण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘कुठलंही आंदोलन असलं की काही चुकीच्या प्रवृत्ती आंदोलनात शिरत असतात आणि आपला स्वार्थ साधत असतात. दिल्लीतल्या आंदोलनात अनेक राजकीय पक्ष आणि संघटना आपापले हेतू साध्य करून अराजकता माजवण्याचा प्रयत्न करतात. दिल्लीतील आंदोलन हे चेहराहीन होतं आणि त्यामुळे ते भरकटल. पोलिसांच्या गाड्या फोडल्या, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. पोलिसानी वेळीच सगळं कंट्रोल केल नसत तर अनर्थ घडला असता. मी सगळ्या आंदोलनावर आरोप करत नाही काही लोक चांगल्या भावनेनेही करत असतील. पण काही लोकांना अराजकता माजवण्याचा हेतू असतो.’
पुढे ते म्हणाले, ‘सदाभाऊ काय बोलले ते मला माहिती नाही पण काही लोक चांगल्या भावनेने करत असतात काही लोक स्वार्थ साधत असतात. सगळे एका दिशेने जाणारे नसतात. काही जणांना नीट पण माहीत नाही. हवसे नवसे गवसे असेही काही पक्ष आहेत ज्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात लोकांनी रिजेक्ट केलेलं आहे. असेही पक्ष यातून काही साध्य होईल का ते पाहत असतात.’
“दादांच्या जयंतीचे औचित्य साधत कर्जमाफीची पहिली यादी जाहीर”
अजित पवार यांच्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची उद्या जयंती आहे. या निमित्ताने अतिशय सुंदर असं चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलेल आहे ज्यात दादांच जीवन पाहायला मिळतोय. त्यांची कारकीर्द या निमित्ताने पाहायला मिळतेय. दादांचा उमदा स्वभाव, त्यांच हास्य त्यांची कठोरता हे सगळं यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. इतक सुंदर चित्रप्रदर्शन आयोजित करणाऱ्यांच अभिनंदन. शक्यता आहे की उद्याच दादांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न करत आहोत.’