गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता एनडीएमध्ये येण्याआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करा अशा सूचना भाजपने दोन्ही राष्ट्रवादीला केल्याची माहिती सूत्रांनी दिलेला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झाल्यास दोन्ही राष्ट्रवादींना केंद्रात एक -एक मंत्रिपद देखील दिसे जाईल अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आता यावर भाजपच्या एका बड्या नेत्याने भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
गिरीश महाजन यांचे राष्ट्रवादीबाबत मोठे विधान
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर आणि NDA प्रवेशावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना महाजन यांनी म्हटले की, NDA सोबत दोन्ही येण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे असं आमचं कोणीही काही म्हटलेलं नाही. आमच्याकडे नवीन पक्ष कुठलाही येणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये विलीनीकरण करावं की नाही हा त्यांचा निर्णय आहे. सूत्र काय म्हणतात तो भाग वेगळा आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे.
महाजन यांचे उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर भाष्य
गिरीश महाजन यांना यावेळी उद्धव ठाकरे यांच्या राम रक्षा म्हणण्याचं काम तुमचं असलं तरी रामाची रक्षा करणे आमचे काम आहे या विधानावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना महाजन यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांच्यात रामच राहिला नाही म्हणून त्यांना आता रामाची आठवण आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यात रामच नाही तर त्यांच्या मागे सेना सुद्धा राहिली नाही. त्यामुळे ते आता राम आठवून सर्व ठिकाणी जाऊन आता टाळ्या वाजवत आहेत, भजन कीर्तन करत आहेत. ज्या काँग्रेसने राम मंदिराला विरोध केला, रामाला काल्पनिक म्हटलं त्याच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलात तर तुमची काय परिस्थिती होणार? आता कितीही नौटंकी केली कितीही नाटक केले त्याचा कुणावरही परिणाम होणार नाही.