Last Updated:
Spain vs Argentina: फिफा विश्वचषक 2026 च्या हाय-व्होल्टेज फायनल सामन्यासाठी स्लोव्हेनियाचे अनुभवी पंच स्लाव्हको व्हिनसिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे अर्जेंटिनाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
न्यू जर्सी : जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एक ऐतिहासिक नोंद होणार आहे. स्लोव्हेनियाचे प्रसिद्ध रेफ्री (पंच) स्लाव्हको व्हिनसिक (Slavko Vincic) यांच्याकडे यंदाच्या विश्वचषक फायनलच्या मुख्य पंचांची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात अंतिम सामन्यात पंचांची भूमिका बजावणारे ते स्लोव्हेनियाचे पहिलेच रेफरी ठरणार आहेत.
46 वर्षीय स्लाव्हको व्हिनसिक हे फुटबॉल जगतातील एक अत्यंत अनुभवी नाव आहे. 2010 पासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘फिफा रेफ्री’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळेच त्यांच्यावर या हाय-व्होल्टेज अंतिम सामन्याची धुरा सोपवण्यात आली आहे.
चालू 2026 फिफा विश्वचषकात फायनलची अंतिम नियुक्ती मिळण्यापूर्वी व्हिनसिक यांनी आधीच तीन सामन्यांमध्ये पंचांचे काम चोख बजावले आहे. त्या सामन्यांमधील त्यांचे अचूक निर्णय आणि मैदानावर शांतपणे खेळाडूंवर ठेवलेले नियंत्रण पाहूनच त्यांना फायनलसाठी निवडण्यात आले आहे.
स्लाव्हको व्हिनसिक यांच्या नावावर फुटबॉल विश्वातील अनेक महत्त्वाच्या सामन्यांचे संचालन केल्याची नोंद आहे. यापूर्वी त्यांनी 2024 च्या प्रतिष्ठेच्या चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये (रिअल माद्रिद विरुद्ध बोरुशिया डॉर्टमंड) मुख्य पंचांची भूमिका बजावली होती.
कतार येथे झालेल्या 2022 च्या विश्वचषकातही त्यांनी महत्त्वाचे सामने हाताळले होते. त्यांचा हा एकूण दुसरा विश्वचषक आहे.
2022 च्या कतार विश्वचषकातील तो ऐतिहासिक सामना फुटबॉल चाहते कधीच विसरणार नाहीत. ज्यामध्ये अर्जेंटिनाला सौदी अरेबियाकडून 2-1 असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला था. या सनसनाटी सामन्यातही स्लाव्हको व्हिनसिक हेच मुख्य पंच होते.
फुटबॉल विश्वात सध्या एका रंजक आकडेवारीचीही चर्चा सुरू आहे. स्लाव्हको व्हिनसिक यांनी आतापर्यंत स्पेनच्या ज्या ज्या सामन्यांमध्ये पंचांचे काम केले आहे, त्या सर्व सामन्यांमध्ये स्पेनचा संघ अजिंक्य (Unbeaten) राहिला आहे. यामध्ये ‘युरो 2024’ च्या उपांत्य फेरीत स्पेनने फ्रान्सविरुद्ध मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचाही समावेश आहे, ज्या सामन्याचे नियंत्रण व्हिनसिक यांनीच केले होते. त्यामुळे या फायनलमध्ये व्हिनसिक यांच्या उपस्थितीचा स्पेनला काही मानसिक फायदा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
एका छोट्या देशातून येऊन फुटबॉल विश्वातील सर्वात मानाच्या मानल्या जाणाऱ्या विश्वचषक फायनलचे पंच होण्याचा स्लाव्हको व्हिनसिक यांचा हा प्रवास क्रीडा जगतासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 18, 2026 10:20 PM IST
World Cup Final: मॅच स्पेनच जिंकणार, निकाल आधीच ठरला; एका निर्णयाने पारडं झुकलं, Spainचा ‘लकी चार्म’ अर्जेंटिनाला रडवणार
