Paresh Rawal on Amitabh Bachchan: बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात. अनेकदा पहाटे तीन वाजता सिने विश्वातील आठवणी, अनुभव आणि त्यांच्या भावना व्यक्त करताना ते दिसतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक सूचक पोस्ट केली होती. ‘काहीतरी बोलायचे होते, पण विचार केला- नको!! ते बोलायला नको.’ एवढीच पोस्ट केल्यामुळे नेमकं अभिनेते अमिताभ बच्चन यांना म्हणायचं काय आहे? अशी चर्चा रंगली.यावर आता अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
या वयात अमिताभ बच्चन आणखी करणार तरी काय? लोक आता बोलायला घाबरतात.सत्तेतील लोकांकडून त्रास होण्याची त्यांना भीती वाटत असते. व्ही.पी.सिंह प्रकरणानंतर त्यांना ज्याप्रकारे टार्गेट करण्यात आलं होतं, त्याचा स्वतः त्यांनी अनुभव घेतला होता. सत्ता तुमच्या विरोधात गेली तर आयुष्य उध्वस्त होऊ शकतं असं म्हणत परेश रावल यांनी बॉलीवुड, राजकारण आणि अमिताभ बच्चन यांच्या बाबतीत काही खुलासे केलेत.त्याचीही सध्या चर्चा आहे.
काय म्हणाले परेश रावल?
अलीकडेच विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते परेश रावल यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयी काही खुलासे केले. ते म्हणाले ‘ लोक घाबरलेले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाची त्यांना भीती वाटते.पूर्वी काही लोक कोणाचीही परवा न करता स्पष्टपणे बोलायचे.पण आता अशा लोकांची संख्या कमी होत चालली आहे. असं अभिनेते परेश रावल म्हणाले. अमिताभ बच्चन यांच्या बाबतीत बोलताना परेश म्हणाले ‘या वयात अमिताभ बच्चन आणखी काय करणार?व्ही पी. सिंह प्रकरणानंतर त्यांना ज्या प्रकारे टार्गेट करण्यात आलं,हे त्यांनी जवळून अनुभवलं आहे. सत्ता तुमच्या विरोधात गेली, तर आयुष्य उध्वस्त होऊ शकतं. त्यांनी नेमकं काय भोगलं, हे आपल्याला पूर्णपणे माहिती नाही, मात्र त्यांनी खूप त्रास सहन केलाय. अमिताभ बच्चन हे वाद घालणारे व्यक्ती नाहीत. त्यांना शांततेत राहायला आवडतं. ते हात जोडून तिथेच वाद संपवतात. हा त्यांचा कमकुवतपणा आहे असं अनेक जण समजतात पण त्यांना भांडण,वाद आणि नकारात्मकता अजिबात आवडत नाही.’ असं परेश रावल म्हणाले.