सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल


बीड : जिल्ह्यात (Beed) गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीच्या घटनांची साखळीच पाहायला मिळत असून एकामागोमाग एक गुन्हे (Crime news) उघडकीस येत आहेत. त्यामध्ये, मारहाण, फसवणूक, खुनाचा प्रयत्न, खून यासह विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, आता चक्क मामानेच भाचाला फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. महसूल विभागात लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका मामाने आपल्या सख्ख्या भाच्याला तब्बल 19 लाख रुपयांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार केज तालुक्यात उघडकीस आला. परभणी येथील न्यायालयात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या मामानेच हा फसवणुकीचा डाव रचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

वाढती बेरोजगारी आणि सरकारी नोकरीत कमी होणार्‍या संधीमुळे अनेकदा युवक नोकरीच्या अमिषाला बळी पडतात. सरकारी खात्यात नोकरी लावतो म्हणून युवकांची आर्थिक फसवणूक केली जाते. त्यानंतर, नोकरीचे आमिष दाखवणारे गायब होतात. आधीच नोकरीचा पत्ता नाही, त्यातच आर्थिक भुर्दंड बसल्याने तरुणाई आणखी तणावात जाते. मात्र, बीड जिल्ह्याच्या केजमध्ये चक्क मामानेच आपल्या भाचाला तब्बल 19 लाख रुपयांना फसवल्याची घटना उघडकीस आली आहे.  

परभणी न्यायालयात लिपिक असलेल्या आरोपी दगडू हंगरगे याने फिर्यादी भाचा अमोल मधुकर चिगुरे याला विश्वासात घेऊन महसूल विभागात लिपिक तथा महसूल सहाय्यक पदावर नोकरीचं आमिष दाखवलं. त्यासाठी, मामाने भाच्याकडे 19 लाख रुपयांची मागणी केली. मामावर विश्वास ठेवून अमोल चिगुरे याने 7 जून 2022 आणि 5 जुलै 2022 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केज शाखेतून ऑनलाईन आरटीजीएस द्वारे आणि त्यानंतर 8 जानेवारी 2023 रोजी रोख स्वरूपात असे मिळून एकूण 19 लाख रुपये मामाला दिले. मात्र, तीन वर्षे उलटूनही भाचाला नोकरी काही लागली नाही. 

केज पोलिसांत गुन्हा दाखल

मामाकडे वारंवार नोकरीबाबत विचारणा करुनही मामाने खोटे आश्वासन देत फसवणूक केली आणि पैसे परत करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमोल चिगुरे याने केज पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मामा दगडू हंगरगे याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी केज पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा

बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *