महायुतीच्या जागावाटपात मोठा ट्विस्ट, रात्रीत घडामोडी घडणार; भाजपकडून हालचालींना वेग – Marathi News | Mahayuti mlc election seat sharing twist bjp moves to resolve eknath shinde discontent late night meeting likely


राज्याच्या राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीची चर्चा रंगली आहे. महायुतीत जागावाटपावरून संभ्रम निर्माण झालेला आहे. काही जागावर एकमत झाले असले तरी महत्त्वाच्या जागांवर शिवसेना आणि भाजप अशा दोनही पक्षांनी दावा केला आहे. जागावाटपाच्या फॉर्मुल्यावरून शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे नाराज असल्याचीही माहिती समोर आली आहे. अशातच आता शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून हालचालींना वेग आला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. यात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भाजपची महत्त्वाची बैठक

समोर आलेल्या माहितीनुसार, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दोन तास विधान परिषदेच्या जागा वाटपात संदर्भात चर्चा झाली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री बावनकुळे हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी रवींद्र चव्हाण व मंत्री बावनकुळे त्यांच्यावर जबाबदारी सोपण्यात आली आहे. लवकरच दोघेही एकनाथ शिंदेची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रात्रीत बैठक होणार

समोर आलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीत हालचाली वाढल्या आहेत. आज रात्री उशिरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री बावनकुळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. या भेटीत शिंदेंकडून केली जाणारी 7 जागांची मागणी आणि शिवसेनेच्या भूमिकेबद्दल हो दोन्ही नेते एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करणार आहे. आज मध्यरात्रीच्या चर्चेत महायुतीच्या जागावाटपावर अंतिम चर्चा होणार आहे. तसेच उद्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

महायुतीच्या फॉर्म्युल्यात ऐनवेळी बदल?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीच्या अंतर्गत जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार अशी चर्चा होती. मात्र, आता नवीन समीकरणानुसार भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र यावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र आता आज रात्रीच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *