Pandharpur Vitthal Mandir VIP Darshan : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य भाविकांना झटपट आणि सुलभ दर्शन मिळावे, याकरिता 15 जुलैपासून व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी मंदिरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या नव्या नियमाचा फटका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसला. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री मात्र लवाजम्यासह दर्शन घेऊन गेल्याने व्हीआयपी दर्शन बंदीचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाल्याचं चित्र बघायला मिळाले. दरम्यान याच व्हीआयपी दर्शनाबाबत एबीपी माझा ने दाखवलेल्या वास्तवांमुळे प्रशासन ॲक्टिव मोडवर आले आहे. व्हीआयपी दर्शन घेण्याचा कोणी प्रयत्न केल्यास आपत्कालीन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिके एन (Solapur District Collector S Karthikeyan) यांनी माझाशी बोलताना दिला आहे. दरम्यान, भर पावसात पाहणीसाठी फिरत असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पावसातच एबीपी माझाशी संवाद साधला.
Vitthal Mandir VIP Darshan : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनानंतर व्हीआयपी दर्शन बंदीची कठोरपणे अंमलबजावणी
प्रोटोकॉल नुसार राज्यातील मंत्री, आमदार, खासदार यांना व्हीआयपी दर्शन घेता येईल. मात्र यावेळी त्यांच्यासोबत दोन किंवा तीन लोकांनाच दर्शनासाठी सोडले जाणार आहे. मंत्री आणि आमदारांच्या सोबत असणारा लवाजमा मंदिरात सोडला जाणार नसल्याचा खुलासाही जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनानंतर पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंदी कालपासून (15 जुलै) लागू करण्यात आली. काल पहिल्या दिवशी थोडा गोंधळ झाल्याची कबुली देताना जिल्हाधिकाऱ्यांनी आता यापुढे अतिशय कठोरपणे व्हीआयपी दर्शन बंदीची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले.
Solapur News : वाखरी येथील मुख्य पुलाला धोका नाही, बाजूचा भराव दुरुस्त करण्याचे काम पूर्ण
दरम्यान, काल (15 जुलै) पहिल्याच पावसात वाखरी येथील नवीन पुलाचा भराव खचला होता. याशिवाय पालखीतळाच्या परिसरात मोठे पाणी जमले होते. याबाबत बोलताना मुख्य पुलाला धोका झाला नसून बाजूचा भराव आता दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाल्याचे ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पहिल्याच पावसात वाखरी पालखीतळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्या बद्दल बोलताना ही कामे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून झाली असून आता पाण्याचा निचरा करण्यासाठी येथे तातडीने नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. तर वारकऱ्यांच्या आगमनापूर्वी पाऊस सुरू झाला असून सोलापूर जिल्ह्याला पावसाची खूप गरज होती, असे सांगत पाऊस सुरू झाल्याने अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास जिल्हाधिकारी कार्तिके यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?